आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Remedesivir Injection Updates: BJP Has Large Reserves Of Remedicivir But The Pockets Of The Drug Ministers Are Empty; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औषधमंत्री सापडले मात्र भाजपचा साठा:भाजपकडे रेमडेसिविरचा मोठा साठा; औषधमंत्र्यांचा खिसा मात्र रिकामा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपच्या साठ्याशी सरकारचा संबंध नाही; रेमडेसिविरचा तुटवडा कायम राहणार असल्याची भीती

६० हजार रेमडेसिविर व्हायलच्या साठ्यावरून रविवारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तू-तू-मैं-मैं रंगली असताना भाजपला रेमडेसिविर आणण्याची परवानगी देणारे राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे मात्र गायब होते. रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांची आणि ते मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण होत असताना उभय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. याप्रकरणी ‘दिव्य मराठी’ने कडक भूमिका घेत औषधमंत्र्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अखेर गायब असलेल्या औषधमंत्री डॉ.शिंगणे यांना ‘दिव्य मराठी’ने सोमवारी गाठलेेच.

रेमडेसिविरच्या या घोळाबद्दल छेडले असता ते म्हणाले, मुंबई पोलिसांना ब्रुक फार्मा कंपनीकडे ६० हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. मात्र रेमडेसिवीरचा साठा जप्त केल्याचे पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला अद्याप कळवलेले नाही. त्यामुळे ब्रुक कंपनीचा रेमडेसिवीरचा निर्यात साठा कुठे आहे याची कल्पना आमच्या विभागाला नसून तो साठा मुंबईत नसावा. तसेच सध्या कंपन्यांनी हात अाखडता घेतला आहे, असे डॉ.शिंगणे म्हणाले. त्यामुळे भाजपकडे रेमडेसिविरचा साठा असला तरीही औषधमंत्री अर्थातच राज्याच्या वाट्याला रेमडेसिविर अाले नाहीच. शिवाय आगामी काळातही रेमडेसिविरचा तुटवडा राहणार हे सुध्दा स्पष्ट झाले.

सरकारला मिळवता येत नाही त्याला भाजपाचा दोष कसा - प्रवीण दरेकर
मी आणि आमदार प्रसाद लाड दोघे दमणला गेलो, तेथील ब्रूक फार्मा कंपनीशी चर्चा केली. त्यांच्याकडील निर्यात साठा महाराष्ट्राला मिळेल यासाठी प्रयत्न केले. खरे तर निर्यात साठा राज्याला मिळवून देण्याचे काम भाजपाने केले. आम्ही मुख्य सचिव सीताराम कुंटे, मंत्री राजेंद्र शिंगणे, मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोललो. देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्र्यांशी बोलले. त्यानंतर राज्याने निर्यात साठा विक्री करण्यास संमती दिली. आता ब्रुक कंपनीचा रेमडेसिविरचा साठा राज्य सरकारला मिळवता येत नाही त्याला भाजपाचा दोष कसा? हा साठा मिळवण्यासाठी सरकार काही प्रयत्न करत नाही. सरकारचा अंतस्थ हेतू वेगळा आहे. उलट ब्रुक कंपनी व आम्हाला सरकार साठेबाज म्हणत आहे. आम्ही ५०,००० रेमडेसिवीरच्या कुप्या राज्य सरकारलाच देणार होतो. यात चूक काय आहे? आजही आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेवटी नागरिकांचे प्राण वाचणे महत्वाचे आहे, असा दावा भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

दिव्य मराठी प्रश्न : प्रवीण दरेकर यांनी १५ एप्रिल रोजी पत्र दिल्यानंतर त्यांना ब्रुक कंपनीकडून रेमडेसिविर खरेदी करण्याची परवानगी १६ एप्रिल रोजी मिळाली कशी ?

डॉ.शिंगणे : भाजप नेते माझ्याकडे रेमडेसिविर उत्पादक ब्रुक कंपनीच्या मालकास १५ एप्रिल रोजी घेऊन आले. त्या वेळी कंपनीने निर्यात साठा विक्रीची राज्यात परवानगी देण्याची मागणी केली. रेमडेसिविर औषध राज्याला मिळेल या उदात्त भूमिकेतून माझ्या विभागाने १६ एप्रिल रोजी काही कंपन्यांना रेमडेसिविरचा निर्यात साठा राज्यात विक्री करण्यास संमती दिली होती. माझ्या विभागाने जेव्हा रेमडेसिविरची या कंपन्यांकडे मागणी नोंदवली, तेव्हा या कंपन्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. इतर राज्यांना आम्हाला रेमडेसिविर पुरवायचे आहे, असे त्यांनी सांगितले. या कंपन्यांना कुणी धमकावले का, त्याविषयी मला काही माहिती नाही.

दिव्य मराठी प्रश्न : अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिल्याची कल्पना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना नव्हती का? त्यामुळे पोलिस कारवाई झाली का ?
डॉ. शिंगणे
: मुंबई पोलिसांनी ब्रुक कंपनीचा मालक राजेश डोकानिया याला शनिवारी रात्री चौकशीसाठी बोलावले होते. पोलिस कुणालाही चौकशीला बोलावू शकतात. पोलिस अनेकदा साठेबाजांविरुद्ध कारवाई करतात, त्यानंतर एफडीएला (अन्न व आैषध प्रशासन) कळवतात. माझ्या माहितीप्रमाणे ब्रुक कंपनीचा रेमडेसिविरचा जो काही निर्यात साठा असेल, तो पोलिसांनी जप्त केल्याचे आमच्या विभागाला तरी कळवलेले नाही, असे स्पष्ट करत तो साठा मुंबईत नसून दमण येथे असावा.

दिव्य मराठी प्रश्न : २० एप्रिलनंतर राज्याला दररोज ७५ हजार रेमडेसिविर प्राप्त होतील,असे आपण सांगितले होते. मग त्यामध्ये भाजपच्या ५० हजार रेमडेसिविरचाही समावेश होता का?
डॉ. शिंगणे
: देशात १५ कंपन्या रेमडेसिविरचे उत्पादक आहेत. दैनंदिन १ लाख ५० हजार कुप्यांचे देशात उत्पादन होते. राज्याला दैनंदिन ५० हजार कुप्यांची गरज आहे. मात्र मध्यंतरी कोरोना रुग्ण घटल्याने कंपन्यांनी उत्पादन कमी केले होते. इतर राज्यांतही कोरोना वाढत आहे. परिणामी राज्याला ३५ हजार रेमडेसिविर प्राप्त होत आहेत. २० एप्रिलनंतर राज्याला दैनंदिन ७५ हजार रेमडेसिविर प्राप्त होतील, असे कंपन्यांवर विश्वास ठेवून मी म्हणालो होतो. पण सध्या कंपन्यांनी हात आखडता घेतला आहे. भाजपवाले राज्य सरकारला की जनतेला ५० हजार रेमडेसिविर कुप्या देणार होते. मात्र त्याचा आणि माझ्या विभागाचा काही संबंध नाही.

राज्यात रेमडेसिविर आैषधाचा मोठा तुटवडा आहे. त्यासंदर्भात शनिवारी मुंबई पोलिसांनी रेमडेसिविर उत्पादक असलेल्या दमण येथील ब्रुक कंपनीच्या व्यवस्थापकाची मुंबईत चौकशी केली होती. त्यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने अन्न व आैषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे तीन प्रश्न उपस्थित केले होते. त्याचे हे उत्तर...

बातम्या आणखी आहेत...