आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संवाद:‘कोरोनासोबतच पाणी संकटाची आठवण ठेवा’; शरद पवारांचा समाजमाध्यमांवर चौथ्यांदा संवाद

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पवार यांनी आपल्या निवासस्थानातून समाजमाध्यमांवर जनतेशी संवाद साधला

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. त्याबरोबरच राज्याला लवकरच पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करायचा आहे. पाणीटंचाईकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी ताकीद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारातील कारभारी, राज्य प्रशासन आणि राज्यातील नागरिकांना दिली.

पवार यांनी बुधवारी मुंबईतील आपल्या निवासस्थानातून समाजमाध्यमांवर जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, कामगारांना संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य पावले टाकली जात आहेत. स्वयंसेवी संस्था, उद्योजक, कामगार संघटना त्याप्रश्नी सहकार्य करत आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे अधिकारी अन्नधान्य सर्वांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेत आहेत.

‘लाॅकडाऊनमुळे अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला आहे. शेतमालास बाजारपेठ नाही. शेतकरी मोठ्या संकटात आहे. त्यामुळे वाशीची कृषी उत्पन्न बाजार समिती चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग बंद आहेत. कामगारांचा पगार मात्र दिला जातो आहे. बँकेचे व्याज चालूच आहे. अशा स्थितीत बेरोजगारीचे प्रमाण वाढणार आहे,’ अशी भीती पवार यांनी व्यक्त केली.

‘कर्ज हप्ते न भरल्यास व्याज आकारू नये, यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने बँकांना स्पष्ट आदेश दिले पाहिजेत. आरबीआयने नुसती पत्रके काढू नयेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी उद्योग, राज्य सरकारे यांना मदतीचा हात दिला पाहिजे,’ अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. ‘केंद्र सरकार सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) वापरते आहे. त्यातला वाटा मुख्यमंत्री सहायता निधीलासुद्धा मिळायला हवा. पंतप्रधान मदतनिधीला जशी कॉर्पोरेट कंपन्या सीएसआर निधीतून मदत करतात, तशी मदत मुख्यमंत्री सहायता निधीलासुद्धा व्हायला हवी,’ अशी मागणी पवार यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...