आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:उक्ती, मुक्ती अन् नवी शक्ती! उद्धव ठाकरेंच्या ‘आजी-माजी-भावी सहकारी’ या वक्तव्याचे पडसाद

मुंबई/औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी औरंगाबादेत जिल्हा परिषदेच्या इमारत भूमिपूजनप्रसंगी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी” असा उल्लेख केला. या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच शनिवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भावी म्हणजे भाजपमधील काही जणांना भावी होण्यासाठी आमच्याकडे यायचे आहे. त्यांना भाजपमधून मुक्ती हवी असल्याचे म्हटले आहे. तिकडे शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील व देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले. शहादा येथून नेहमीच महाराष्ट्रातील नव्या प्रयोगांची सुरुवात होते, असे सूचक वक्तव्य या वेळी जयंत पाटील यांनी केल्याने संजय राऊत यांच्या मुक्तीच्या उक्तीसह राज्यात नव्या शक्ती उदयास येत आहेत का याची जोरदार चर्चा सुरू आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेणारे नेते संजय राऊत यांनी आजी-माजी आणि भावी सहकारी या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर विधानानंतर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत या दोघांत सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर राऊत यांनी प्रसारमाध्यमांना त्या विधानातील भावी सहकारी म्हणजे काय हे स्पष्ट केले. राऊत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषण करण्याची एक विशिष्ट शैली आहे. त्या शैलीत त्यांनी औरंगाबादेत भाष्य केले. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, ज्यांना भावी सहकारी व्हायचे आहे ते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. भाजपमधील अनेकांना त्या पक्षातून बाहेर पडून आमच्याकडे यायचे आहे.

आमच्याकडे या, स्पष्ट संकेत : राऊत
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात नवीन आघाडी होईल असा उल्लेख केलेला नाही, तसेच आघाडी सरकारमधून आम्ही बाहेर पडू असेही ते म्हणालेले नाहीत असे स्पष्ट करून राऊत म्हणाले की, ज्यांना इकडे यायचे आहे त्यांच्यासाठी उद्धवजींनी संकेत दिले आहेत की तुम्ही इकडे या.

‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार नाराज?
मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या आजी-माजी आणि भावी सहकारी या विधानावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नाराज असल्याची चर्चा आहे. आघाडीत सर्व व्यवस्थित असताना अशा वक्तव्याची गरज काय? अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे नापसंती व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...