आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर 100 कोटींच्या वसूलीचे गंभीर आरोप केले आहेत. हे धक्कादायकच नव्हे तर अतिशय गंभीर आहे. त्यांनी एक व्हॉट्सअॅप चॅट सुद्धा जोडले आहे. हा थेट पुरावा आहे की अशा प्रकारच्या पैशांचा व्यवहार झाला. पोलिस खात्यात सुरू असलेल्या राजकारणाचा हा कळस असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
महाराष्ट्राची मान खाली घालणारे प्रकरण
पत्रकारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पोलिस विभागात ज्या प्रकारची प्रकरणे उघडकीस येत आहेत. पोस्टिंग, बदल्यांमध्ये जसे राजकारण करून त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. त्यात आजची घटना त्याचा कळस आहे. पोलिस विभागाची अतिशय वाइट परिस्थिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत गृहमंत्री आपल्या पदावर राहूच शकत नाहीत. हे पोलिसांचे खच्चीकरण आणि महाराष्ट्राची मान खाली घालणारे प्रकरण आहे.
केंद्रीय तपास संस्थेवर विश्वास नसेल तर...
या प्रकरणात गृहमंत्र्यांचा केवळ राजीनामाच नाही तर प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. केंद्रीय तपास संस्थांना ही चौकशी करू द्यावी. राज्य सरकारला केंद्रीय तपास संस्थांवर विश्वास नसेल तर कोर्ट मॉनिटरची पद्धत अवलंब करावी. परंतु, जोपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत हा विषय गांभीर्याने घ्या आणि तत्काळ राजीनामा द्या असे फडणवीस म्हणाले आहेत.
स्पष्टीकरण देण्यापेक्षा राजीनामा द्या
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आरोप फेटाळून लावले. पण, आरोपांवर स्पष्टीकरण देण्यापेक्षा तत्काळ राजीनामा द्या. त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय या प्रकरणाची निःपक्ष चौकशी शक्यच नाही. मुख्यमंत्र्यांना थेट मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावर राहिलेल्या सिंह यांनी पत्र पाठवून गंभीर आरोप केले आहेत. किमान नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाई करावी आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. परमबीर सिंह यांच्या आरोपांना दुर्लक्ष करून नये असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गृहमंत्र्यांची ताबडतोब हकालपट्टी करा - किरीट सोमय्या
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सांगतात, गृहमंत्री अनिल देशमुख वसूलीचा धंदा करत होते. सचिन वाझे त्यांचे वसूली एजंट होते. अशा प्रकारची वसूली करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांची ताबडतोड हकालपट्टी झाली पाहिजे असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.
राष्ट्रपती राजवट लागू करा -रामदास आठवले
महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय वाइट बनली आहे. सचिन वाझे आणि शिवसेनेचे संबंध जगजाहीर आहेत. तर राज्यात शिवसेनेचेच मुख्यमंत्री आहेत. अशात परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले यांनी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.