आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना निर्बंधांत शिथिलता:औरंगाबाद, जालन्यासह 25 जिल्ह्यांत निर्बंध शिथिल होणार; बीड, नगर, सोलापूरसह 11 जिल्हे मात्र जैसे थे राहणार; अंमलबजावणीचा मुहूर्त मुख्यमंत्र्यांच्या हातात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 ऑगस्टपर्यंत निर्बंध ‘जैसे थे’ ठेवा : टास्क फोर्स

ज्या जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संसर्ग दर राज्याच्या दरापेक्षा कमी आहे अशा २५ जिल्ह्यांतील कोरोना टाळेबंदीचे निर्बंध लवकरच शिथिल करण्यात येणार आहेत. स्तर तीनमध्ये असलेल्या ११ जिल्ह्यांत मात्र ‘जैसे थे’ निर्बंध राहतील, असे सूतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. अर्थात हे निर्बंध कधीपासून शिथिल होणार याविषयी निश्चित माहिती नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत गुरुवारी राज्य कोरोना कृती दल आणि अारोग्य विभाग यांची संयुक्त बैठक पार पडली. त्या बैठकीत कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

कृती दलाच्या सदस्यांनी १५ आॅगस्टपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याची सूचना केली अाहे. यासंदर्भात राज्याचा आरोग्य विभाग आणि कोरोना कृती दलाने स्वतंत्र अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला असून त्याचा अभ्यास केल्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. राज्यात ३६ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग दर कमी झाला आहे. तेथे दुकाने, सलून, हाॅटेल यांना रात्री ८ पर्यंत मुभा देण्यात येईल.

व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांना ५० टक्के क्षमतेने उघडण्यास संमती मिळेल. आठवड्यातील सध्याची शनिवार-रविवारची दोन दिवसांची दुकानांची टाळेबंदी एक दिवस केली जाईल. शनिवारी सायंकाळी ४ पर्यंत दुकानांना परवानगी देण्यात येईल. विवाह सोहळ्यांसाठी उपस्थितांना १०० पर्यंत मुभा देण्यात येईल. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम सध्या पूर्णपणे बंद आहेत. अशा कार्यक्रमांना उपस्थितांच्या संख्येची मर्यादा घालून मुभा देण्यात येणार आहे.

मराठवाड्यात दीडपट जास्त बेडची तयारी सुरू; सप्टेंबरअखेर तिसऱ्या लाटेची शक्यता
केरळात कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर २५ जिल्ह्यांतील निर्बंध सरसकट शिथिल केल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा राज्याला धोका संभवतो, असा इशारा देऊन निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात यावेत. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे त्या जिल्ह्यात शिथिलता नको, असे स्पष्ट मत कोरोना कृती दलाने गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत व्यक्त केले. १५ ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्येचा अंदाज घ्या आणि त्यानंतर २५ जिल्ह्यांत मुभा द्यायची की नाही यासंदर्भातील विचार करण्यात यावा, असे कृती दलाने सांगितले आहे.

दरम्यान, एकीकडे निर्बंध शिथिल करण्याच्या विचारात राज्य शासन असताना सप्टेंबरअखेर तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशापेक्षा दीडपट अधिक बेडची तयारी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत सुरू झाली आहे. येणाऱ्या लाटेत ४५ हजार बेड लागतील, असा प्राथमिक अंदाज वरिष्ठ स्तरावरून वर्तवण्यात आला. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून ६४ हजार बेड तयार झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिसऱ्या लाटेत ६५ टक्के रुग्णांवर घरीच उपचार करावे लागणार आहेत. ३५ टक्के रुग्णालयात दाखल होतील. मात्र, रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेपेक्षा खूप मोठी असेल.

औरंगाबादकरांना दिलासा; गुरुवारी कोरोना मृत्यू शून्य
निर्बंध शिथिल होण्याच्या बातमीसोबतच औरंगाबादकरांच्या दृष्टीने गुरुवारी आणखी एक दिलासादायक घटना घडली. जिल्ह्यात २४ तासांत कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. नवे रुग्ण २८ आढळले तर त्यापेक्षा अधिक म्हणजे ३७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. सविस्तर. दिव्य सिटी

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात संसर्ग कायम
११ जिल्हे अजूनही स्तर तीनमध्ये आहेत. त्यामुळे तेथे कोणतीही सवलत दिली जाऊ शकत नाही. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि मराठवाड्यातील बीड, तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहेे.

  • शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने खुली, रविवारी पूर्णत: लॉकडाऊन
  • व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे ५०% क्षमतेने सुरू
  • विवाह सोहळ्यांसाठी १०० वऱ्हाडींना परवानगी
  • दुकाने, हॉटेल्स, सलून रात्री ८ वाजेपर्यंत खुली

आज अधिसूचना जारी होण्याची शक्यता
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे निर्बंधांबाबतची अधिसूचना नागरिकांना माहिती व्हावी यासाठी ४८ तास पूर्वी काढावी लागते. १ आॅगस्टपासून २५ जिल्ह्यांतील कोरोना निर्बंध काही अंशी शिथिल करायचे व तसा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यास शुक्रवारपर्यंत अधिसूचना जारी होईल, असे सूत्रांनी सांगितले.

या जिल्ह्यांमध्ये मुभा
मराठवाडा

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर

उत्तर महाराष्ट्र
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार

विदर्भ
नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली.

कोकण- मुंबई
ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर

बातम्या आणखी आहेत...