आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्रम्प उडी:ट्विटरचा मालक एलॉन मस्कचे ट्विट रिट्विट करत फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटरचा मालक एलॉन मस्कचे ट्विट रिट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज HMV पत्रकार आणि विरोधकांवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील प्रकल्प पळवापळवीवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपात त्यामुळे भर पडली आहे.

एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याबद्दल हे ट्विट केले होते. त्या ट्विटला फडणवीस यांनी जोड देऊन ते रिट्विट केले असून, त्याची चांगलीच चर्चा रंगलीय.

मस्कचे ट्विट काय?

एलॉन मस्क आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ट्रम्प ट्विटरवर परत येणार का, असा प्रश्न मला ज्या-ज्या वेळी कोणी विचारला. त्या प्रत्येकाच्या प्रश्नामागे मला डॉलर मिळाला असता, तर आज ट्विटरकडे भरपूर पैसा असता, अशी मिश्किल टिपण्णी एलॉन मस्क यांनी केली आहे.

फडणवीसांचे ट्विट काय?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलॉन मस्क यांचे हेच ट्विट रिट्विट करत विरोधांवर निशाणा साधलाय. या ट्विटला रिट्विट करताना फडणवीस यांनी आपल्या दोन ओळी जोडल्यात. त्यात ते म्हणतात की, माझ्या पक्षावरील प्रत्येक फेक नरेटिव्हसाठी जर मला एक रुपया मिळाला असता, तर आज भारतीय जनता पक्षानेही भरपूर पैसा कमावला असता.

कुठून झाली सुरुवात?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एक पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला होता. यावेळी ते म्हणाले होते की, महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेले हे महाविकास आघाडीचे पाप आहे. महाराष्ट्रात आमचे सरकार येऊन तीनच महिने झाले, तरीही महाराष्ट्रातून उद्योग चालले आहेत, असे फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय. या फेक नरेटिव्हमध्ये काही राजकीय पक्ष आणि त्यांची इकोसिस्टिम आणि दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतके चार-पाच HMV (His Masters Voice) पत्रकार. हे सगळे मिळून महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातलाय, असा आरोप त्यांनी केला होता.

रोहित पवारांचे प्रत्युत्तर

रोहित पवार यांनी एक ट्विट करून फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात की, महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो.. युवा असो... किंवा सामान्य नागरिक असो.. हे सर्वचजण नक्कीच #HMV म्हणजे #He_is_Maharashtra's_Voice आहेत. राजकीय नेते गप्प बसले तरी खरे #HMV मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत. पवार आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात की, कितीही प्रयत्न केले तरी सामान्यांचा आवाज दाबता येत नाही. आजची राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्या प्रत्येकालाच आवाज उठवावा लागणार आहे आणि #WMV म्हणजेच #We_Are_Maharashtra's_Voice व्हावं लागणार आहे.

आदित्य ठाकरेही आक्रमक

फडणवीस यांनी पत्रकारांना HMV (His Masters Voice) संबोधल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला आहे. हा पत्रकार आणि पत्रकारितेचा अपमान आहे. हेच पत्रकार आमच्याविरोधात लिहतात. बोलतात. आता तेच त्यांच्याविरोधात लिहतायत. त्यांना असे संबोधने अपमानजनक आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपले शब्द मागे घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...