आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्तीचा वाद:विधान परिषदेच्या 12 आमदार नियुक्तीचा योग्य निर्णय करतो; आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाला राज्यपालांचा शब्द

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांनी घेतली राज्यपालांची भेट

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवडीबाबत योग्य निर्णय करतो, असा शब्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुधवारी दिला. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. गेल्या ९ महिन्यांपासून रखडलेल्या विधान परिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांच्या नियुक्त्यांना मंजुरी द्यावी, अशी विनंती केली.

स्वातंत्र्यदिनी पुणे येथे एका कार्यक्रमात काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांनी राज्यपालांना १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत छेडले होते. त्या वेळी सरकार पाठपुरावा करीत नाही, मग तुम्ही का आग्रह करता? असा उलट सवाल राज्यपाल कोश्यारी यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारच्या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बुधवारी राज्यपालांना भेटले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे असे चार सदस्यीय शिष्टमंडळ बुधवारी रात्री ७.३० वाजता राजभवनवर गेले हाेते. या शिष्टमंडळाची सुमारे तासभर राज्यपालांशी चर्चा झाली. भेट संपल्यावर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यपाल महोदयांना आम्ही राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. खान्देशात झालेला मोेठा पाऊस, झालेले नुकसान आणि राज्यातील धरणांची स्थिती याबाबत माहिती दिली. तसेच १२ आमदारांच्या निवडीचा विषयही निघाला असे सांगून विधान परिषदेच्या जागा रिक्त राहिल्याने सभागृह चालवण्यात अनेक अडचणी येतात.

विधान परिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांच्या शिफारशी करून मोठा कालखंड झाला आहे. त्यामुळे या नियुक्त्या लवकर मार्गी लावा, अशी विनंती राज्यपालांना केल्याचे पवार म्हणाले. राज्यपालांनी आमचे म्हणणे एेकून घेतले. त्यांना काही प्रश्न होते, त्याबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच १२ सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्याबाबत मी योग्य निर्णय करतो, असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे आहेत आमदारकीच्या प्रतीक्षेत

राष्ट्रवादी काँग्रेस
१) एकनाथ खडसे, २) राजू शेट्टी ३) यशपाल भिंगे, ४) आनंद शिंदे.

शिवसेना
१) ऊर्मिला मातोंडकर, २) नितीन बानगुडे पाटील, ३) विजय करंजकर, ४) चंद्रकांत रघुवंशी. { काँग्रेस : १) सचिन सावंत, २) रजनी पाटील, ३) मुजफ्फर हुसेन, ४) अनिरुद्ध वनकर.

बातम्या आणखी आहेत...