आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज रितेश आणि जिनिलीया भावुक झाले. पप्पा तुमची रोज आठवण येते. तुमच्याशिवाय आमचा एकही दिवस जात नाही, असे म्हणत त्यांनी विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला.
विलासराव देशमुख यांच्याबद्दल त्यांचे पुत्र अमित देशमुख, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनीही अभिवादन व्यक्त करत आदरांजली वाहिली.
रितेशची हळवी पोस्ट...
अभिनेता रितेशचे वडील विलासरावांसोबतचे नाते खूप घट्ट होते. त्याने पूर्वी विलासरावांबद्दलचा असाच एक भावस्पर्शी व्हिडिओ पोस्ट केलेला. आज जंयतीदिनी त्याने पप्पांची रोज आठवण येत असल्याचे सांगितले. आपल्या कठीण काळात, जेव्हा अक्षम-अपुरे वाटते. आपला पराभव झाल्यासारखे जाणवते, तेव्हा मी कोणाचा मुलगा आहे, हे मला आठवते. आणि मी जगाला घेऊन जाण्यास तयार आहे, याचे जाणीवही होते. पप्पा तुमची रोज आठवण येते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे म्हणत रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या.
सूनबाई म्हणतात की...
विलासराव देशमुखांची सून आणि रितेशची पत्नी जिनिलियानेही एक भावनिक पोस्ट लिहिलीय. सोबत आपल्या दोन्ही मुलांचे फोटो पोस्ट केलेत. हे फोटो विलासरावांबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर आपल्याला सांगून जातात. जिनिलिया आपल्या पोस्टमध्ये म्हणते, काही व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पापा. आम्ही प्रत्येक दिवशी तुम्हाला साजरं करतो.
अमित म्हणतात की...
विलासरावांचे पुत्र अमित देशमुख आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, आपल्या कार्यकर्तृत्वाने जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या ७८ व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!
शरद पवार म्हणतात की...
शरद पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, स्व. विलासराव देशमुख यांनी कृषी व सहकार क्षेत्राला बळ देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत केला. लोकांच्या प्रश्नांची अचूक जाण असणारे कुशल प्रशासक व राजकारणातील अजातशत्रू असे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
अजित पवार म्हणतात की...
अजित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, व्यापक जनसंपर्क, प्रभावी वक्तृत्व, कर्तृत्व, अथक परिश्रम आणि उत्तम प्रशासकीय कौशल्याच्या बळावर राजकीय क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवणारे, आपल्या मनमिळावू व दिलखुलास स्वभावानं जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवणारे तसंच राज्याच्या विकासाला गती देण्यात मोलाची भूमिका पार पाडणारे माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
खरगे म्हणतात की...
मल्लिकार्जुन खरगे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, 'लोकनेता' म्हणून स्मरणात असलेल्या विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाची आठवण होते. ते कट्टर काँग्रेसी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद त्यांनी भूषविल्याचा उल्लेखही खरगेंनी केला आहे.
सरपंच ते मुख्यमंत्री
विलासराव देशमुखांचे गाव लातूर जिल्ह्यातले बाभळगाव. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या विलासरावांनी गावच्या सरपंच पदापासून आपली वाटचाल सुरू केली. त्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष, आमदार, मंत्री आणि दोन वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी आपली छाप सोडली. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी वेगवेगळ्या पक्षात राहूनही जपलेल्या मैत्रीचे किस्से आजही आठवणीत आहेत. त्यांचे वक्तृत्वही मोहवणारे होते.
इतर बातम्याः
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.