आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्र्यांचे भाष्य:रस्त्यांच्या कामांमध्ये शिवसैनिक अडथळे आणताय या गडकरींच्या तक्रारीवर अजित पवारांचे भाष्य, म्हणाले - 'हा त्रास ताबडतोब थांबवला गेला पाहिजे'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गडकरींना शिवसेनेची कार्यपद्धती माहीत नव्हती काय - पटोले

राज्यातील महामार्गांच्या कामामध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक वारंवार अडथळे आणत असून शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामे बंद पडतील. तसेच मंजूर कामांबाबतही फेरविचार करावा लागेल, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. गडकरींच्या या तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी पोलिस महासंचालकांना चौकशी करण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे.

'हा त्रास ताबडतोब थांबवला गेला पाहिजे'
यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 'मी याबाबची बातमी काल वाचली आहे. तो आरोप आहे, या आरोपात त्यामध्ये तथ्य आहे की नाही ते तपासून पाहणे गरजेचे. गेल्या 30 वर्षांपासून मी समाजकारणात आणि राजकारणात काम करतोय. त्या दरम्यान नेहमी सांगत आलो आहे की, हा जनतेचा पैसा असतो. जनतेच्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी व्हायला हवा. कामाचा दर्जा चांगला राखला गेला पाहिजे. तो दर्जा चांगला राखला जात नसेल तर संबधित ठेकेदारावर कारवाई व्हायलाच पाहिजे. जर ठेकेदार चांगल काम करत असेल आणि काही जण राजकीय पक्षाचा आधार घेऊन, अथवा मिळालेल्या पदाचा गैरवापर करून जर कोणाला त्रास देत असेल तर तो त्रास ताबडतोब थांबवला गेला पाहिजे' असे अजित पवार म्हणाले आहेत.

गडकरींनी मुख्यमंत्र्यांना दोन पानी पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये वाशीम जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याची तक्रार केली आहे. राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे, यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

गडकरी म्हणतात, कंत्राटदारांना धमक्या, मशिनरीची जाळपोळ

अकोला-नांदेड महामार्गावर वाशीम बायपासचे काम ठप्प
अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरू आहेत. गेडशी ते वाशीम या पॅकेज-२ मध्ये वाशीम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे कामही समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

पुलाचे काम अर्धवट स्थितीत, कंत्राटदाराचे काम थांबवले
वाशीम मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.

गडकरींना शिवसेनेची कार्यपद्धती माहीत नव्हती काय - पटोले
25 वर्षे भाजप आणि शिवसेना एकत्रित राहिले. त्या काळात नितीन गडकरींनी कधीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसंदर्भात, शिवसेनेच्या वागणुकीबद्दल असे वक्तव्य केले वा पत्र लिहिले नाही. गडकरींना शिवसेनेची कार्यपद्धती माहीत नव्हती काय, असा खोचक सवाल करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. शहर काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. आता हे पत्र वरच्या दाढीवाल्याच्या (मोदी) दबावात लिहिले आहे का, असाही प्रश्न निर्माण होत असल्याचे पटोले म्हणाले. देशात रस्ते निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधले जात आहेत. गडकरींनी या मुद्द्यावर एखादी श्वेतपत्रिका काढावी, असे पटोले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...