आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारताला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून देणाऱ्या कॉस्च्यूम डिझायनर भानू अथय्या (९१) यांचे मुंबईत कुलाबा येथे गुरुवारी निधन झाले. भानू अथय्या मूळ महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील असून त्यांचे नाव भानुमती अण्णासाहेब राजाेपाध्ये असे आहे. “गांधी’ चित्रपटातील वेशभूषेसाठी त्यांना जॉन मोलो यांच्यासोबत सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार म्हणून हा सन्मान संयुक्त प्रदान करण्यात आला होता. १९५६ मध्ये “सीआयडी’ चित्रपटातून आपली कारकीर्द सुरू केलेल्या भानू यांनी प्यासा, चौदहवी का चांद, साहिब-बीवी और गुलाम या चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझायनिंग केले होेते. त्यांच्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केलेल्या भावना...
‘गांधी' चित्रपटातली कस्तुरबा लिहितेय खास ‘दिव्य मराठी'साठी... याच कलाकृतीने भानू अथय्यांना मिळाला सन्मान
वेशभूषाकार भानू अथय्या यांच्याविषयी मी ऐकले होते, पण प्रत्यक्षात आमची भेट ‘गांधी’ चित्रपटाच्या वेळी झाली. त्या एकाच चित्रपटात आम्ही सोबत काम केले. मात्र, वेशभूषा या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे व प्रतिभावान कलाकार त्यात किती पराकोटीच्या नेमकेपणाने काम करतो, हे मूर्तिमंत दर्शन तेव्हा मला घडले. मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची विद्यार्थिनी असल्याने वेशभूषा हा विषय परिचित होताच, पण भानू किती सखोल जाणकार आहेत, हे त्यांना भेटल्यावरच मला समजले. ‘गांधी’ चित्रपटातील दोन प्रसंग मला आठवतात. दक्षिण आफ्रिकेतून परत येताना गांधी हे गोपाळ कृष्ण गोखलेंना पार्टीत भेटतात. तेव्हा कस्तुरबांनी बुट्टीवाली साडी नेसली होती, असा फोटो अथय्यांनी मिळवला होता. कस्तुरबांचा अशा साडीतला तो एकमेव फोटो होता. तो पुरावा समोर ठेवून त्यांनी तशीच बुट्टीवाली साडी खास तयार करून घेतली होती. उलट्या आकाराच्या इंग्रजी एम अक्षरासारखी बुट्टी त्यावर एम्ब्रॉयडरी केली होती..
दुसरी आठवण त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीची. द. आफ्रिकेत असतानाचे कपडे पारशी शैलीचे व सिल्किश पोताचे दिसतात, तर भारतात परतल्यावर फक्त खादीचे कपडे दिसतात. नजरेला हा फरक जाणवतो. गांधी टोपीदेखील त्यांनी संशोधन करून बनवल्या होत्या.
आठवतंय की, ट्रायलसाठी मी त्यांच्या घरी जात असे. आत गेलो, की प्रचंड पुस्तके आणि डिझाइन्स (ड्राॅइंग्ज) लक्ष वेधून घेत. त्या नावापुरत्या वेशभूषाकार नव्हत्या. त्यांच्याकडे त्या विषयाची अॅथाॅरिटी होती. ज्ञान होते. स्वतःचा विचार, स्वतंत्र शैली होती. फक्त छान दिसतंय, म्हणून त्यांनी काही केले नाही. ते वस्तुस्थितीला धरून आहे का, याचा विचार केला. त्यामुळे एकसंधतेचा धागा गुंफलेला दिसतो. चित्रपट ऐतिहासिक, पौराणिक, पोशाखी, प्राचीन, अर्वाचीन, समकालीन.. कुठल्याही जाॅनरचा असला, तरी या वस्तुस्थितीचे भान जागे असल्याने अथय्यांचे काम नेहमीच वेगळे ठरले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन..!
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.