आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटावर मारहाणीचा आरोप:ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर आता पुढचे उपचार लीलावती रुग्णालयामध्ये होणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना पुढील उपचारासाठी लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर संपदा रुग्णालयात उपचार सुरू होते.

संपदा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या रिपोर्टरमध्ये रोशनी शिंदे यांना गंभीर दुखापत नाही नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्या गर्भवती नसल्याचे सांगितले आहे. मात्र, आता शिंदे यांच्या कुटुंबीयांनी त्यांना लीलावतीमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमके प्रकरण काय?

ठाण्यात शिंदे गटाच्या प्रवक्त्याने रणजित इंगळे या पत्रकाराला सोमवारी धमकी दिली. त्याबद्दल युवा सेनेच्या रोशनी शिंदे यांनी पोस्ट केली. त्यात ‘दिघे साहेब असते तर त्यांनी अशा वेळी काय केले असते ते सर्वांना माहितीय. नुसतं आनंद मठ नावावरून काही होत नसतं,’ असा टोला एकनाथ शिंदेंना लगावला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या महिलांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार रोशनी यांनी केली आहे. मात्र, त्यांची फिर्याद पोलिसांनी घेतली नाही.

ठाकरेंनी घेतली भेट

रोशनी शिंदे यांची मंगळवारी उद्धव, आदित्य व रश्मी ठाकरे यांनी संपदा रुग्णालयात भेट घेत चौकशी केली. ते पोलिस आयुक्तांना भेटायला गेले. मात्र, ते उपस्थित नव्हते. दुसरीकडे शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे रोशनी यांना मारहाण केल्याचे आरोप फेटाळून लावलेत. रोशनीला समजावण्यास गेलो, पण ती उलटसुलट बोलली, तेव्हा फक्त धक्काबुक्की झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांच्या तक्रारीवरून रोशनी शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेची सोशल मीडियावरून बदनामी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठाकरेंचे आरोप

रोशनी शिंदे यांच्या मारहाण प्रकरणावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्यात. ठाण्यात गुंडागर्दी वाढते आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणायचे की गुंडा मंत्री, असा आरोप त्यांनी केला. शिवाय राज्याला फडतूस गृहमंत्री, लाचार, लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री लाभलाय. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. महिलांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. सरकारला कोर्ट नपुंसक म्हणाले होते त्याची प्रचिती काल आले, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

फडणवीसांचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. जेलमध्ये गेलेल्या दोन मंत्र्यांचे राजीनामे न घेता त्यांची व वाझेसारख्या भ्रष्टांची लाळ घोटणाऱ्यांना आमच्याबद्दल बोलण्याचा काहीच अधिकार नाही. सध्या ते नैराश्यातून काहीही बोलत आहेत. पण जर आमचे तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्तृत्व शून्य माणूस, घरकोंबडा म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली.