आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) प्रदेशाध्यक्ष व गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. आमदार गुट्टे यांची तब्बल २५५ कोटींची मालमत्ता ईडीने गुरुवारी जप्त केली. गुट्टे यांनी मात्र याप्रकरणी मला काहीही बोलायचे नाही, असे ‘दिव्य मराठी’ला सांगितले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक गुट्टे यांना भोवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गंगाखेड शुगर्स कारखान्यास गाळपाबाबत लावलेल्या अटी साखर आयुक्तांनी काढाव्यात, अशी विनंती करण्यासाठी मध्यंतरी गुट्टे यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला ते महादेव जानकर यांच्यासह गेले होते. या भेटीत त्यांनी बीडचे पालकमंत्री, राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत पवारांकडे तक्रार केली होती.
रासप संस्थापक व आमदार महादेव जानकर यांचा पक्ष राज्यात भाजपसोबत आहे. मात्र धनगर समाजाचे फायरब्रँड नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपने पक्षात घेतल्याने जानकर चांगलेच नाराज आहेत. त्यामुळे जानकर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसोबत जाणार, अशा चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. गुट्टे यांच्यावरील कारवाईला या वादाची मोठी किनार असल्याचे सांगण्यात येत आहे. गंगाखेड शुगर कारखान्याने शेतकरी सभासदांच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर ३२८ कोटी रुपयांचे पीक कर्ज घेतल्याचा गुन्हा गुट्टे यांच्यावर आहे. याप्रकरणी रत्नाकर गुट्टे यांना मार्च २०१९ मध्ये अटक झाली होती. गजाआड असताना गुट्टे यांनी रासपकडून विधानसभेचा अर्ज भरला आणि ते आमदार झाले. पण आता राष्ट्रवादीशी जवळीक त्यांना भोवली असल्याचे बोलले जात आहे.
शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप
शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढून ती रक्कम आपल्या कंपनीत गुंतवल्याचा गुट्टे यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्याप्रकरणी गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपन्यांची परभणी, बीड आणि धुळे येथील तब्बल २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.