आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 मार्च रोजी 21 हजार कोटींचे झाले वितरण:सरत्या आर्थिक वर्षाला मंत्रालयात लगीनघाई

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरत्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. ३१) मंत्रालयात वित्त विभागाकडून निधी पदरात पाडून घेण्यासाठी विविध विभागांची लगीनघाई दिसून आली. निधी व्यपगत होऊ नये आणि निधी वेळेत जमा होऊन तो खर्च व्हावा म्हणून तसेच केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीला मॅचिंग ग्रट मिळावी म्हणून विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी वित्त विभागात गर्दी केली होती. वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांनीही रात्रीचा दिवस करून रात्री १२ वाजेपूर्वी २१ हजार ६३४ कोटींचे प्रस्ताव मार्गी लावले.

वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. चालू आर्थिक वर्षात निधी खर्च झाला नाही तर तो व्यपगत होऊन शासकीय कोषागारात जमा होतो. विविध विभागांची शेवटच्या दिवसापर्यंत निधीसाठी उडणारी तारांबळ टाळण्यासाठी वित्त विभाग टप्प्याटप्प्याने निधी वितरित करते. मात्र, विभागाकडून निधी खर्च होत नाही. मार्च महिन्यात निधी खर्च करण्यासाठी विभागांची धावपळ असते. शेवटच्या महिन्यात ७० ते ८० हजार कोटी रुपये वितरित केले जातात. पैकी शेवटच्या आठवड्यात निम्मा निधी दिला जातो.

लेखाशीर्षाखाली तरतूद केलेला निधी त्या आर्थिक वर्षात खर्च करावा लागतो, अन्यथा तो अखर्चित राहतो. हे टाळण्यासाठी मार्च महिन्यात निधीचे पुनर्वितरण आणि पुनर्विनियोजन केले जाते. तरीही शेवंटच्या दिवसापर्यत विविध विभागाच्या नस्ती येत राहतात. विविध खात्याचे कक्ष अधिकारी, अवर सचिव, उपसचिव यांनी नस्ती घेऊन वित्त विभागात गर्दी केली होती. मात्र, या सर्व गडबडीमध्ये अधिकाऱ्यांसह सर्वच कर्मचारी आणि शिपायांची देखील चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले.

निधी प्राप्त झाल्यानंतर लगेच देयके तयार सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य, आदिवासी विकास, सामाजिक न्याय आदी खात्यांच्या योजना मोठ्या असतात. पूर्ण झालेल्या कामांची देयके ३१ मार्चपूर्वी अदा केली जातात. संबंधित विभागांना सरकारच्या बीम्स प्रणालीद्वारे निधी वितरित होतो. हा निधी प्राप्त झाल्यानंतर लगेच देयके तयार करून ती मंजूर केली जातात.