आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल भट हत्या:‘काश्मीर फाईल्स’चे प्रमोशन करणारे पंतप्रधान राहुल भटच्या हत्येवर गप्प का? सचिन सावंत यांचा सवाल

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी सरकारने गेली 8 वर्षे काश्मिरी पंडितांच्या दुखाग्नीवर राजकीय पोळ्या भाजल्या आणि सत्तेच्या बाजारात काश्मिरी पंडितांचे दुःख विकले हे स्पष्ट झाले आहे, या शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘काश्मीर फाईल्स’चे प्रमोशन करणारे पंतप्रधान राहुल भटच्या हत्येवर गप्प का? असा सवाही सचिन सावंत यांनी केला.

मोदी सरकारने गेली ८ वर्षे काश्मीरी पंडितांच्या दुखाग्नीवर राजकीय पोळ्या भाजल्या आणि सत्तेच्या बाजारात काश्मीरी पंडितांचे दुःख विकले हे स्पष्ट झाले आहे. राहुल भट या काश्मीरी पंडित तरुणाच्या हत्येसोबत लाखो काश्मीरी पंडितांच्या आशा आकांक्षा आणि स्वप्नांची चिताही रचली गेली आहे, अशे म्हणत सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला.

चित्रपटात अर्धसत्य -

भाजप समर्थित व्हि पी सिंह सरकारच्या काळात काश्मीरी पंडितांचे स्थलांतर झाले. तरीही काश्मीरी पंडितांचे दुःख व कलम ३७० चे भांडवल सातत्याने भाजपा करत राहिला. २०१९ ला ३७० कलम हटवताना काश्मीरमधील दहशतवाद संपेल व पंडितांची घरवापसी होईल असे आश्वासन दिले. पण दहशतवाद पूर्वीपेक्षा वाढला. देशभर मुस्लिम द्वेष पसरविण्यासाठी भाजपाने काश्मीरी पंडितांवरील अत्याचाराचा, अनुपम खेरसारख्या पिट्टूचा व अंकीत मिडियाचा वापर केला. काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे प्रमोशन पंतप्रधान स्वतः करत होते. जनभावना भडकावण्यासाठी चित्रपटात अर्धसत्य व अंगावर शहारे आणणाऱ्या हिंसेचा वापर केला गेला, असा आरोप सचिन सावंत यांनी केला.

काश्मीरी मुसलमानांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले
निर्मात्यांनी 250 कोटींपेक्षा जास्त कमावले पण काश्मीरी पंडितांचे हात मात्र रिते राहीले. आज काश्मीरमध्ये जे सुरु आहे ती कोणत्या चित्रपटाची कथा नसून वास्तविकता आहे हे चित्रपटाचे प्रमोशन करणाऱ्या पंतप्रधान मोदी व भाजपाने लक्षात घ्यावे. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात दहा वर्षांत 3 हजार पेक्षा जास्त पंडितांना नोकऱ्या दिल्या. 5911 घरे बांधली. पण मोदी सरकारने काहीच केले नाही. उलट काश्मीरी मुसलमानांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचे त्यांनी म्हटले.

पंडित सुरक्षिततेवरुन मोदी सरकारला जाब -

स्थानिक पंडितांचे जीवन धोक्यात घातले. राहुल भटच्या सरकारी कार्यालयात झालेल्या हत्येनंतर पंडित सुरक्षिततेवरुन मोदी सरकारला जाब विचारत आहेत. तर पोलिस अश्रूधूर व लाठ्यांचा वर्षाव करत आहेत. काश्मीरी पंडितांचे डोळे उघडले. भाजपाकडून धर्मांधतेची अफूची गोळी खाल्लेल्यांचे डोळेही उघडतील, असेही त्यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले.

राहुल भट हत्या -
मध्य काश्मीरच्या बडगाममधील चांदूरमध्ये असलेल्या तहसीलदार कार्यालयात नोकरी करणाऱ्या राहुल भट याची दहशतवाद्यांनी ऑफिसमध्ये घुसून बंदुकीच्या गोळ्या झाडून गुरुवारी हत्या केली होती. यावरुन पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित अद्यापही सुरक्षित नाहीत आणि त्यांना दहशतवादी दिवसाढवळ्या लक्ष्य बनवत आहेत, अशी वास्तविकता समोर येताना दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...