आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न सचिन तेंडुलकर, बिग बी अमिताभ बच्चन यांना आता आपल्या बंगल्यात वाढीव मजले बांधता येणार आहेत. मुंबई महापालिकेकडून बंगल्यातील अधिकच्या बांधकामास अखेर या दोन्ही सेलिब्रिटींना परवानगी दिली आहे.
वाढीव मजले बांधण्यासाठी सचिन तेंडूलकर व अमिताभ बच्चन यांनी महापालिका आणि सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. याशिवाय गौतम अदानी यांचे व्याही असलेल्या सिरिल श्रॉफ यांच्या वरळी सीफेसवरील बंगल्याच्या वाढीव बांधकामासही मंजुरी देण्यात आली आहे.
सचिनला चौथा, पाचवा मजला उभारण्याची परवानगी
मुंबईतील वांद्रे परिसरात समुद्र किनाऱ्याजवळच सचिन तेंडुलकरचा बंगला आहे. या बंगल्यात सध्या अप्पर बेसमेंट, लोवर बेसमेंट, तळमजला व तीन मजले असे बांधकाम आहे. चौथ्या मजल्याचेही काही काम करण्यात आले आहे. सचिन तेंडूलकर व कुटुंबीय चौथ्या मजल्यावरच राहतात. सागरी हद्दीत येत असल्याने सचिनच्या बंगल्याला 1 फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) देण्यात आला होता. त्यामुळे सचिन आणि अंजली तेंडुलकर यांनी या बंगल्यात अतिरिक्त बांधकामाच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. सचिन तेंडुलकरने दिलेल्या अर्जानुसार त्यांना बंगल्याचा चौथा आणि पाचवा मजला बांधायचा आहे. अधिकचा FSI मिळवण्यासाठी सचिन तेंडुलकरने प्रीमियम भरण्याची तयारी दाखवली आहे. त्यानुसार सीआरझेड कायद्यातंर्गत सचिन तेंडुलकर यांना बंगल्यातील अतिरिक्त कामकाजाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता तेंडुलकर कुटुंबीयांना चौथ्या मजल्यावरील बांधकाम आणि पाचवा मजला उभारण्याची मुभा मिळाली आहे.
बच्चन यांना बांधायचा आहे दुसरा मजला
जुहू येथील कपोल सोसायटीमध्ये अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला आहे. बेसमेंट, 2 अप्पर फ्लोअर अशी या बंगल्याची रचना आहे. जया बच्चन यांच्याकडूनही त्यांच्या बंगल्याच्या बांधकामात बदल करण्यासाठी सीआरझेडची परवानगी मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. अर्जानुसार जलसा बंगल्याचा दुसरा मजला पूर्णपणे बांधायचा आहे. सध्या दुसऱ्या मजल्यावरील काही भागातच बांधकाम आहे. तसेच राहण्यासाठी आणखी एक मजला बांधता यावा, यासाठी बच्चन यांच्याकडून परवानगीचा अर्ज करण्यात आला होता. त्याला आता परवानगी देण्यात आली आहे.
अदानींच्या व्याहींनाही परवानगी
याशिवाय गौतम अदानी यांचे व्याही असलेल्या सिरिल श्रॉफ यांच्या वरळी सीफेसवरील बंगल्याच्या वाढीव बांधकामासही मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, सीआरझेडच्या अटी, शर्थींनुसारच वाढीव बांधकाम करावे, अशी अट घालण्यात आली आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन व सिरिल श्रॉफ या सर्वांना वाढीव बांधकाम करताना तयार होणारा राडारोडा सीआरझेड क्षेत्रात टाकता येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.