आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने प्रतिमा मलिन केल्याबाबत मुंबई पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
परवानगीशिवाय सचिनचे नाव, फोटो आणि आवाजाचा वापर केल्याबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
5 मे रोजी तक्रारदाराला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एक जाहिरात दाखवण्यात आली, ज्यामध्ये सचिनचा फोटो दिसत होता. या जाहिरातीत सचिन या उत्पादनांना मान्यता देतो, असे म्हटले होते. ही वेबसाइट सचिनच्या नावाचा वापर करून फॅट कमी करणारे स्प्रे विकत होती. उत्पादन खरेदी करणाऱ्या व्यक्तीला सचिनच्या स्वाक्षरीचा टी-शर्ट मिळण्याचा दावाही केला गेला होता. या कारणावरून पोलिसात तक्रार करण्यात आली असून आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल
'सचिन हेल्थ डॉट इन' असे नाव असलेल्या वेबसाईटवरून सचिन तेंडुलकरच्या फोटोंचा वापर करत फार्मास्युटिकल उत्पादनांची जाहिरात केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माहिती तंत्रज्ञान कायद्याव्यतिरिक्त भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 465 (बनावट) आणि 500 (बदनामी) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे, अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, तेंडुलकरच्या एका सहाय्यकाने गुरूवारी पश्चिम विभागीय पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवली.
तक्रारीत काय म्हटले आहे?
तक्रारदाराने सांगितले की, त्याला एका फार्मास्युटिकल कंपनीची ऑनलाईन जाहिरात आली, ज्यात सचिन कंपनीव्या उत्पादन लाइनला मान्यता देत असल्याचा दावा केला होता. त्यांना sachinhealth.in ही वेबसाईट सापडली, ज्याने तेंडुलकरचे छायाचित्र वापरून या उत्पादनांची जाहिरात केली.
या तक्रारीत असे म्हटले आहे की, सचिन कंपनीला त्याचे नाव आणि छायाचित्र वापरण्याची परवानगी दिली नाही. सचिनची प्रतिमा डागाळत असल्याने कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
सचिन काय म्हणाला?
दरम्यान, या प्रकरणानंतर सचिनने ट्विट करत " विश्वासार्ह उत्पादने मिळणे आवश्यक असून समुदायांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्मची रिपोर्टिंग आणि ब्लॉकिंग टूल्स वापरा. अधिक सुरक्षित ऑनलाइन वातावरण तयार करण्यासाठी सक्रिय होऊ या" असे आवाहन सचिनने केले.
त्याचबरोबर एक पत्रक प्रसिध्द करत त्याने संपूर्ण प्रकरणाचाही उल्लेख केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.