आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अँटिलिया स्फोटक प्रकरणात शुक्रवारी आणखी एक नवीन खुलासा झाला. यामध्ये स्फोटके असलेली स्कॉर्पिओ ज्या दिवशी चोरीला गेली होती, त्याच दिवशी गाडीचा मालक मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांची भेट झाली होती. स्फोटके प्रकरणात अटकेत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक वाझे यांच्याकडे अनेक आलीशान कार होत्या. त्यापैकी तीन कार आता केंद्रीय तपास संस्था NIA च्या ताब्यात आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने एकूण 5 कार ताब्यात घेतल्या. त्यापैकी दोन कार मर्सेडीज आणि प्राडो गुरुवारी संध्याकाळी एका पार्किंगमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या. यातील प्राडो ही रत्नागिरी येथील एका शिवसेना नेत्याच्या नावे आहे.
दिल्लीच्या फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने गुरुवारी NIA चे कार्यलय गाठले होते. या ठिकाणी आज ते वाझेंची मर्सेडीज कार तपासत आहेत. वाझेंची पहिली कार 16 मार्च रोजी जेजे स्कूल ऑफ आर्ट येथील BMC च्या पार्किंगमध्ये उभी होती. वाझेंनी ही कार 13 किंवा 14 मार्च रोजी या ठिकाणी पार्क केली होती. तेथील गार्डने सांगितल्याप्रमाणे, यापूर्वीही अनेकदा याच ठिकाणी ही कार पार्क करण्यात आली होती.
स्कॉर्पिओ चोरीला गेल्याच्या दिवशी घेतली मनसुखची भेट
प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA च्या हाती नवीन CCTV फुटेज लागले आहे. सूत्राच्या माहितीनुसार, यामध्ये अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन आणि वाझे यांची CSMT जवळ 17 फेब्रुवारी रोजी भेट झाली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे, मृत्यूपूर्वी पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये मनसुखने याच दिवशी आपली स्कॉर्पिओ चोरीला गेल्याचा दावा केला होता. मनसुख ओला कॅबमध्ये वाझे यांना भेटण्यासाठी गेला होता. कार चोरीला गेल्यानंतरचा हा सीसीटीव्ही असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. एका मीडिया रिपोर्टमध्ये हेदेखील सांगण्यात आले की NIA ला संबंधित स्कॉर्पिओ कारची चावी सापडली.
भेटीच्या दिवशी कुठे-कुठे गेली होती मर्सेडीज?
NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CCTV फुटेजमध्ये ज्या मर्सेडीज कारमध्ये बसून वाझे पोलिस मुख्यालयातून निघताना दिसून आले त्याच दरम्यान वाझेंनी मनसुखची भेट घेतली होती. यानंतर CSMT मुख्य चौकात त्यांची कार दिसून आली. या ठिकाणी ग्रीन सिग्नल लागले होते. तरीही वाझे यांची कार पुढे गेली नाही. थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी मनसुख आला आणि कारमधून बसला. यानंतर कार पोस्ट ऑफिसजवळ दिसून आली. या ठिकाणी 10 मिनिटे थांबल्यानंतर मनसुख तेथून निघून गेला. यानंतर मर्सेडीज पुन्हा पोलिस मुख्यालयात जाताना दिसून आली.
त्या ओला कॅब ड्रायव्हरचीही चौकशी
मनसुखला CSMT पर्यंत सोडणारा ओला कॅब ड्रायव्हरची सुद्धा NIA कडून चौकशी करण्यात आली आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे, CSMT जात असताना मनसुखला 5 वेळा कॉल आले होते. कॉल करणाऱ्याने आधी मनसुखला पोलिस मुख्यालयसमोर असलेल्या शोरूमजवळ बोलावले. शेवटच्या कॉलमध्ये त्यांनी मनसुखला CSMT च्या सिग्नलवर बोलावले. तपास संस्थेने सीसीटीव्ही जपून ठेवण्यासाठी त्याचे कंत्राट असलेल्या L&T शी संपर्क साधला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.