आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुखांच्या दोन सहकाऱ्यांसह सचिन वाझे यांना 11 एप्रिलपर्यंत CBI कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली, परंतु देशमुख सरकारी जे.जे. रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना अटक करता आली नाही. अर्जात, सीबीआयने चौकशीच्या उद्देशाने आरोपींच्या कोठडीची मागणी करत म्हटले की, आरोपींना दिल्लीतील एजन्सीच्या मुख्यालयात घेऊन जावे लागेल, जेथे त्यांची चौकशी करण्यात येईल. अनिल देशमुख सध्या जे.जे. रुग्णालयात असून, त्यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी
विशेष सीबीआय न्यायालयाने सचिन वाझे, शिंदे आणि पालांडे यांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे, मात्र, अनिल देशमुख यांच्यावर कोणताही आदेश देण्यास नकार देत तपास अधिकाऱ्याने आधी माजी मंत्र्यांच्या तब्येतीची चौकशी केल्याचे दाखवावे लागेल. कोठडीसाठी केलेल्या अर्जात, एजन्सीने आरोप केला आहे की, देशमुख यांनी 4 एप्रिल रोजी सीबीआय कोठडी आणि तपास टाळण्यासाठी जाणून-बुजून रुग्णालयात दाखल झाले. सीबीआयने चौघांच्या कोठडीची मागणी करणाऱ्या अर्जात म्हटले आहे की, देशमुखांसह तिघांचे जबाब तुरुंगात नोंदवले गेले आहेत, परंतु त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. न्याय व निष्पक्ष निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी चौघांची चौकशी करणे आवश्यक आहे.
देशमुखांना 2 एप्रिलपासून रुग्णालयात नेण्यात आले होते
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना 2 एप्रिलपासून जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. देशमुख यांच्या खांद्याचे ऑपरेशन होणार असल्याने, वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनिल देशमुख सध्या ऑर्थररोड जेलमध्ये असून, सीबीआय त्यांचा ताबा घेणार होती. कोर्टाने त्यासंबधी मंजुरी देखील दिली होती. त्यात शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी असल्याने आज सीबीआय त्यांचा ताबा घेणार होती, मात्र अनिल देशमुख सध्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आहेत. त्यांच्या खांद्याचे ऑपरेशन होणार असून, अजून काही दिवस देशमुख रुग्णालयात राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सीबीआयला अनिल देशमुखांचा ताबा घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये आरोप केला होता की, राज्याचे तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांना शहरातील रेस्टॉरंट आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते पण मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर राजीनामा दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.