आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अँटिलिया स्फोटके प्रकरणातील संशयित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्या घरातून ६२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात अाली आहेत. विशेष म्हणजे पोलिस खात्याने त्याला केवळ ३० काडतुसे जारी केली होती. त्यापैकी फक्त ५ सापडली आहेत, अशी माहिती एनआयएचे वकील अतिरिक्त साॅलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी गुरुवारी विशेष एनआयए न्यायालयात दिली. या वेळी अँटिलिया प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, मला बळीचा बकरा बनवले जात आहे, असा गंभीर आरोप वाझे याने न्यायालयात केला. न्यायालयाने वाझेला ३ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास बुधवारीच एटीएसकडून एनआयएकडे आला.
एक पोलिस अधिकारीच गुन्ह्यात सामील असल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला असे सांगून अँटिलिया आणि हिरेन मृत्यूचे प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे. त्या संंबंधित आणखी दोन जणांना अटक करण्यात आली अाहे. त्या दोघांची वाझेसोबत आमनेसामने चाैकशी करण्याची गरज असल्याने वाझेची कोठडी १५ दिवस वाढवण्याची मागणी अनिलसिंग यांनी केली. वाझेला १३ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्याची कोठडी गुरुवारी संपली. मात्र न्यायालयाने केवळ १० दिवसांची कोठडी दिली.
माझा संबंध नाही, मला अडकवले : स्फोटके सापडल्यानंतर दीड दिवस मी तपास अधिकारी होतो. माझ्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले. परंतु कुठेतरी अचानक सूत्रे हलली. या घटनांमागे काही पार्श्वभूमी आहे. ती मला न्यायालयात सगळं काही लिखित स्वरूपात सांगायची आहे. १३ मार्च रोजी एनआयए कार्यालयात जाताच मला अटक करण्यात अाली. मग मी गुन्हा कबूल केला असे बोलले जात आहे, परंतु ते चुकीचे असून मी गुन्हा कबूल केलेला नाही, असे वाझे याने स्पष्ट केले.
परमबीर उच्च न्यायालयात : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देेशमुखांची तत्काळ आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. गृहमंत्र्यांनी सचिन वाझेला रेस्टाॅरंट, बारचालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये हप्ता वसूल करण्यास सांगितले, असा आरोप याचिकेत करण्यात अाला आहे.
मनसुख-वाझेचा व्हिडिओ
मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या मुंब्रा-रेतीबंदर परिसरात एनआयए पथकाने वाझेसह रात्री पाहणी केली. तत्पूर्वी, सकाळी मनसुख यांचा १७ फेब्रुवारी रोजीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात मनसुख हे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानक परिसरातील सिग्नलवर थांबलेल्या एका मर्सिडीजमध्ये बसताना िदसतात. ही मर्सिडीच वाझेची असल्याचा एनआयएला संशय आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.