आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:नायर रुग्णालयात कोरोनाबाधित 300 मातांची सुखरूप प्रसूती

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गर्भातील बाळाला संसर्ग होत नाही

मुंबई पालिकेच्या नायर रुग्णालयात लाॅकडाऊन काळात तब्बल कोरोनाबाधित ३०० मातांच्या सुखरूप प्रसूती करण्याचा विक्रम झाला आहे. जन्मलेल्या ३०६ पैकी केवळ १० अर्भकांना काेरोनाची बाधा झाली होती, त्यांची चाचणी आता निगेटिव्ह आली आहे. रविवारी येथील प्रसूतींची संख्या ३०२ झाली आहे. एप्रिल महिन्यात ‘कोविड रुग्णालय’ म्हणून घोषित झालेल्या नायर रुग्णालयात १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली. तेव्हापासून २ महिन्यांच्या कालावधीत नायर रुग्णालयात ३०२ कोरोनाबाधित मातांच्या सुखरूप प्रसूती पार पडल्या आहेत.

यामध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश आहे. शनिवारी एका तान्हुल्याच्या मंगलस्वरांनी त्रिशतकी टप्पा ओलांडला. त्यामुळे येथील नवजात बाळांची संख्या ३०६ झाली आहे, अशी माहिती नवजात शिशू व बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डाॅ. सुषमा मलिक यांनी दिली. अशा प्रकारे एका रुग्णालयात ३०० कोरोनाबाधित मातांची प्रसूती होण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण आहे. त्यासाठी येथील ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत पीपीई किट घातल्यानंतर सलग सहा तास पाणी न पिता किंवा शरीरधर्मही न उरकता अव्याहतपणे काम केले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत जन्मलेल्या ३०६ तान्हुल्यांपैकी १० शिशूंची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तथापि, त्यांच्यामध्ये कोविडची लक्षणे आढळून आली नव्हती. तसेच डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांची करण्यात आलेली वैद्यकीय चाचणी “निगेटिव्ह’ आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. येथे झालेल्या ३०२ प्रसूतींपैकी १८९ प्रसूती म्हणजेच ६३ टक्के या ‘नॉर्मल डिलिव्हरी’ प्रकारातील होत्या. तर, उर्वरित ११३ अर्थात ३७ टक्के या ‘सिझेरियन डिलिव्हरी’ प्रकारातील होत्या.

गर्भातील बाळाला संसर्ग होत नाही

पोटात असणाऱ्या बाळाच्या आईला जरी कोविडचा संसर्ग असेल तरी पोटातल्या बाळाला हा संसर्ग होत नाही. मात्र, जन्मल्यानंतर आईच्या संपर्कातून हा संसर्ग होऊ शकतो, असे नायर रुग्णालयाच्या डॉ. सुषमा मलिक यांनी सांगितले. प्रसूती झालेल्या ३०२ मातांपैकी २५४ मातांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागावर कोरोना रुग्णांची हेळसांड केल्याबाबत सध्या मोठी टीका होत आहे. मात्र, ३०० कोरोना मातांच्या सुखरूप प्रसूतीबद्दल पालिकेच्या आरोग्य विभागाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.

बातम्या आणखी आहेत...