आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या साहित्य क्षेत्रात अतिशय महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ हिंदी साहित्यिक माधव कौशिक विजयी झाले. या निवडणुकीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे पराभूत झाले. त्यांना केवळ तीन मते मिळाली.
साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षपदी दिल्ली विद्यापीठाच्या प्रोफेसर कुमुद शर्मा यांची निवड झाली आहे. साहित्य अकादमीच्या इतिहासात पहिल्यांदा या पदावर एका महिलेची निवड झाली आहे. त्यांनी राधा कृष्णन यांचा केवळ एका मताने पराभव केला.
अशी झाली निवडणूक
साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत झाली. त्यात रंगनाथ पठारे यांच्यासह माधव कौशिक आणि कन्नड साहित्यिक मल्लपुरम व्यंकटेश रिंगणात होते. तर एकूण 97 जणांनी मतदान केले. त्यात कौशिक यांना 60, मल्लपुरम व्यंकटेश यांना 35, तर पठारे यांना फक्त 3 मते पडली. उपाध्यक्षपदासाठी कुमुद शर्मा आणि राधा कृष्णन रिंगणात होते. यात अध्यक्षपदी माधव कौशिक तर उपाध्यक्षपदी कुमुद शर्मा यांची निवड झाली. माधव कौशिक आता मावळते अध्यक्ष चंद्रशेखर कम्बार यांच्याकडून पदभार स्वीकारतील. माधव कौशिक हे हरियाणातल्या भिवानीचे आहेत. त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1954 रोजी. त्यांनी हिंदीत विपुल लेखन केले आहे.
गझल संग्रह
माधव कौशिक यांचे आईनों के शहर में, किरण सुबह की, सपने खुली निगाहों के, हाथ सलामत रहने दो, आसमान सपनों का, नई सदी का सन्नाटा, सूरज के उगने तक, अंगारों पर नंगे पाँव, खूबसूरत है आज भी दुनिया, सारे सपने बागी हैं हे गझल संग्रह प्रसिद्ध आहेत.
कथा-कविता...
माधव कौशिक यांनी सुनो राधिका, लौट आओ पार्थ या खंड-काव्याचे लेखन केले आहे. त्यांची मौसम खुले विकल्पों का, शिखर संभावना के ही नवगीतांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. तर ठीक उसी वक्त, रोशनी वाली खिड़की हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तर सबसे मुश्किल मोड़ पर, एक अदद सपने की हे कवितासंग्रही आहेत.
मुलांसाठी लेखन...
कौशिक यांनी नवगीत की विकास यात्रा, कसौटी पर शब्द ट असे समीक्षणात्मक लेखन केले. त्यांनी लहान मुलांसाठी खिलौने मिट्टी के, आओ अंबर छू लें ही पुस्तके लिहिली. तसेच हरियाणा की प्रतिनिधि हिंदी कविता, समकालीन हिंदी ग़ज़ल संग्रह या पुस्तकांचे संपादन केले आहे.
नेमाडेही झाले होते पराभूत...
साहित्य अकदमीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यापूर्वी भालचंद्र नेमाडे रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांना फक्त चार मते मिळाली. त्यांनी प्रचार करण्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचे मानले गेले. त्यामुळे यंदा पठारे यांनी जोरदार प्रचार केला. मतदारांशी संपर्क साधला होता. मात्र, तरीही त्यांना अपयश आले.
नेहरू पहिले अध्यक्ष...
भारतीय साहित्याच्या विकासासाठी 12 मार्च 1954 रोजी साहित्य अकादमीची स्थापन झाली. जवाहरलाल नेहरू साहित्य अकादमीचे 1963 साली पहिले अध्यक्ष झाले. त्यांच्या निधनानंतर 1964 साली डॉ. एस. राधाकृष्णन यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर 1968 मध्ये डॉ. झाकीर हुसेन साहित्य अकदमीचे अध्यक्ष झाले. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दक्षिणेतील साहित्यीकांचे वर्चस्व राहिले आहे. आत्तापर्यंत वि. कृ. गोकाक (१९८३), यू. आर. अनंतमूर्ती (१९९३) आणि मावळते अध्यक्ष चंद्रशेखर कम्बार (२०१८) हे तीन कन्नड साहित्यिक अकादमीचे अध्यक्ष झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.