आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कदमांनंतर देशपांडेंचा नंबर:साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांना बेड्या, अनिल परबांच्या अडचणी वाढल्या

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कथित साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी उद्योजक आणि अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या अटकेनंतर आता ईडीने तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना बेड्या ठोकल्यात.

साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा त्यांचावर आरोप आहे. त्यांच्या अटकेमुळे परबांच्या अडचणीत वाढ झाल्याचे समजते.

अनियमितता केल्याचा ठपका

रामदास कदम यांचे बंधू आणि अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना नुकतेच ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, त्यानंतर त्यांना अटक केल्याचे दाखवले. आता या प्रकरणी दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडेही गोत्यात आलेत. त्यांचे यापूर्वीही पदावर असताना अनियमितता केल्याच्या आरोपाखाली निलंबन झाले होते. त्यानंतर चौकशी सुरू होती. आता बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांना आज कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

सभेनंतर कारवाईचा धडाका

उद्धव ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी खेडमध्ये सभा झाली. त्या सभेसाठी सदानंद कदम यांनी मोठी ताकद लावली. ही सभा झाल्यानंतर कदमांना बेड्या ठोकण्यात आल्या. आता देशपांडे रडावर आलेत. विशेष म्हणजे देशपांडे यांचे निलंबन झाल्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यामुळेच देशपांडे यांची अटक परबांसाठी डोकेदुखी ठरू शकते, असा अंदाज आहे.

मनी लाँड्रिंगचा आरोप

पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे साई रिसॉर्ट पाडण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात दिली होती.

कदमांवरही आरोप

साई रिसॉर्ट प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोलीचे आमदार संजय कदम यांनीही रामदास कदम यांच्यावर आरोप केले होते. कदम म्हणाले होते की, साई रिसॉर्ट हे अनिल परबांचे नाही. तर ते रामदास कदम यांचा भाऊ सदानंद कदम यांचे आहे. रामदास कदम हे काय आहेत, हे जनतेला माहित आहे. जे सख्ख्या भावाचे झाले नाहीत, ते जनतेचे काय होणार असा टोलाही हाणला होता.

संबंधित वृत्तः

सदानंद कदम ईडीच्या ताब्यात:ठाकरे गटाचे नेते अनिल परबांचे निकटवर्तीय, रामदास भाईंचे बंधू; साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई

बातम्या आणखी आहेत...