आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''महाराष्ट्राला खिजवण्यासाठी ओवैसी बंधु औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होत आहेत. महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा डाव असून एक दिवस त्याच कबरीत ओवैसींना जावे लागेल अशा प्रखर शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एमआयएम नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली. संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते.
एमआयएम नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठी औरंगाबादेत आले होते. त्यानंतर त्यांनी खूलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावरुन त्यांच्यावर मोठी टीका केली जात आहे. यावर संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली.
राऊत म्हणाले, औरंगजेब साधु-संत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्याने लढाई लढली. औरंगजेबाला मराठ्यांनी मातीत गाडलं, तुम्हालाही एक दिवस मातीतच जावे लागेल असे म्हणत तिथे नतमस्तक होण्याची गरज नसतानाही औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होऊन ते महाराष्ट्रातील वातावरण बिघडवत आहेत असा आरोपही त्यांनी केला.
अकबरुद्दीन ओवैसींवर हल्लाबोल करीत संजय राऊत म्हणाले की, औरंगजेबाचे भक्त राजनिती करीत आहेत त्यांचेही हाल होतील, ज्या कबरीवर ते नतमस्तक होत आहेत एक दिवस ओवैसींनाही त्याच कबरीत जावे लागेल अशी जहरी टीकाही संजय राऊत यांनी केली.
काश्मिरमधील पंडीत, नागरीक सुरक्षित नाही
मोदी, शाह यांचा कश्मिरी पंडीतांची घरवापसी हा अजेंडा आहे पण काश्मिरी पंडीतांची हत्या होत आहेत. तेथील नागरीक सुरक्षित नाही. काश्मिरचे वातावरण खराब होत आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीरपणे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घ्यावा. केवळ काश्मिरी पंडीतांचीच नाही तर सामान्य लोकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्राने विचार करावा असा सल्लाही राऊत यांनी दिला.
कठोर पाऊले उचला
केंद्राने पाकिस्तानकडे बोट दाखवू नये, कठोर पाऊले उचलावीत, एका बाजूने चीन घुसखोरी करीत आहेत त्यामुळे याचाही विचार करायला हवा. काश्मिरी पंडीतांची घर वापसी होत नसेल ते सुरक्षित नसतील आणि तेथील सामान्य जनताही सुरक्षित नसेल तर 370 कलम मागे घेऊन फायदा काय झाला असा सवालही त्यांनी केला.
महाविकास आघाडीची एकता राखा
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीसंबंधी केलेल्या भाष्यावर व्यक्त होत राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचे आहे त्यामुळे जबाबदारीने बोलायला हवे. महाविकास आघाडीच्या एकतेला तडा जाईल असे कृत्य करु नये असेही राऊत म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.