आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगामध्ये कोरोनाकाळाची तीन वर्षे अद्याप पूर्ण व्हायची आहेत. या काळात भारतातील पगारदार वर्ग अत्यंत मजबूत झाला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये बाजारात उतरलेल्या नव्या कंपन्यांनी कुशल कर्मचाऱ्यांवरील फोकस वाढवत त्यांना सरासरी ७.१४ लाख रुपये वार्षिक वेतन देऊन भरती केले आहे. हे वेतन २०१९ पर्यंत भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी वेतनापेक्षा तीनपट जास्त आहे. कोरोनाकाळ सुरू होण्याआधी नव्या कंपन्या २.६३ लाख रुपये सरासरी वार्षिक वेतनावर भरती करत होत्या. हे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) सर्वेक्षणातून समोर आले आहे. सीएमआयईने गेल्या काही काळात लिस्ट झालेल्या कंपन्यांतील ७ लाख कर्मचाऱ्यांच्या सर्व्हेआधारे अहवाल तयार केला आहे. अहवालात हेदेखील सांगण्यात आले की, गेल्या तीन वर्षांत देशातील पगारदार वर्ग घटला आहे. २०१९ मध्ये देशात सुमारे ९ कोटी पगारदार होते. ते आता ८.६ कोटी आहेत. मात्र, जे पगारदार कोरोनाकाळात नोकरी वाचवण्यात यशस्वी ठरले किंवा नव्या नोकऱ्या मिळवू शकले त्यांचे वेतन २ ते ३ पटीने वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते, पगारदार वर्ग घटला असला तरी त्यांची क्रयशक्ती वाढली आहे. ती अर्थव्यवस्थेसाठी चांगला संकेत आहे.
हाही चांगला संकेत : कृषीवर अवलंबून लोक घटले, औद्योगिक पगारदार वाढले देशात गेल्या ३ महिन्यांत औद्योगिक क्षेत्रातील पगारदार वाढले आहेत, तर कृषीवर अवलंबून कामगार घटले आहेत. हा चांगला ट्रेंड आहे. कारण देशाची अर्धी लोकसंख्या अजूनही कृषीवर अवलंबून आहे. देशात गेल्या फक्त ३ महिन्यांत (फेस्टिव्ह सीझन) ८५ लाख पगारदार वाढले. पैकी बहुतांश अौद्योगिक क्षेत्राचे आहेत. सीएमआयईचे एमडी महेश व्यास म्हणाले, नव्या कंपन्यांनी कुशल कर्मचाऱ्यांना भरती केले. नवीन भरती घटली, पण त्यांना मिळणारे वेतन ३ पट जास्त आहे. कंपन्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कर्मचाऱ्यांवर जास्त गंुतवणूक करत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
बेरोजगारी दर ६.४% ने वाढून ७.८%, शहरांमध्ये रोजगाराचा शोध वाढला सीएमआयईनुसार, नोव्हेंबरमध्ये देशात बेरोजगारी दर वाढून ७.८% झाला. तो ऑक्टोबरमध्ये ६.४% होता. असे असतानाही देशात अौद्योगिक क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या प्री-कोविड पातळीपेक्षा जास्त झाली आहे. देशामध्ये बेरोजगारी वाढण्याचे कारण शहरांत कामाचा शोध घेणाऱ्यांची संख्या वाढणेदेखील आहे. बहुतांश लोक गावातून शहरांत येत आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागांत बेरोजगारी दर घटला आहे. देशात ६३% पगारदार कर्मचारी वर्ग शहरांत आहे. आगामी काळात रोजगाराच्या सर्वाधिक संधी ऑटो व ट्रेड सेक्टरमध्ये असू शकतात.
चिंता... मनरेगाअंतर्गत काम मिळवणारे लोक ३ वर्षांच्या नीचांकी पातळीवर देशात मनरेगाअंतर्गत मिळणाऱ्या रोजगाराची पातळी गेल्या तीन वर्षांच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. सीएमआयईच्या मते, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये देशात एकूण १.१८ कोटी कामगारांना काम मिळाले नाही. यापैकी बहुतांश ग्रामीण भागातील आहेत. इथे कृषीनंतर मनरेगा हेच रोजगाराचे सर्वात मोठे माध्यम आहे. चिंतेची बाब म्हणजे कामगार वर्गाची कमाई कोरोनाकाळात महागाईच्या तुलनेत जास्त वाढली नाही. तज्ज्ञांनुसार, कोरोनाकाळात कमाई वाढण्याचा फायदा केवळ पगारदार वर्गाला झाला, कामगार वर्गाला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.