आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा आणि काळे झेंडे दाखवणाऱ्या आंदोलकांना अटक हा कोणता न्याय आहे, असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी केलाय.
पुण्यात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यावर संभाजीराजे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
इथून झाली सुरुवात...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची त्यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याने गोची केली आहे. आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो. तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातला विषय. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले. यावरून वाद सुरू झाला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय.
काळे झेंडे दाखवले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्याविरोधात स्वराज्य संघटनेने आंदोलन करत कोश्यारींना काळे झेंडे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक काँग्रेसनेही राज्यपालांच्या विरोधात असंतोष व्यक्त करत काळे झेंडे दाखवले. या आंदोलकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे युवराज छत्रपती संभाजीराजे संतप्त झालेत. त्यांनी सरकारला खडा सवाल केलाय.
राजे म्हणाले की...
युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणतात, राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा! हा कोणता न्याय?
तरीही उघड माथ्याने फिरता
संभाजीराजे पुढे म्हणतात, "स्वराज्य"चे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे भगतसिंग कोश्यारीला काळे झेंडे दाखवले. म्हणून स्वराज्यच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत?
हा कुठला न्याय?
संभाजीराजे पुढे म्हणतात की, आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अवमान करून कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संविधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलिस कारवाई करतात. हा कुठला न्याय आहे? असा सवाल त्यांनी केलाय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.