आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे विधानसभेत पडसाद उमटले. आमदार संजय रायमुलकर आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत प्रश्न विचारत अपघातप्रवण स्थळांवर उपायोजना करणार का, असा सवाल केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावणार असल्याची घोषणा केली. तसेच महामार्गावर जिथे एंट्री होते, तिथेच गाडीतल्या प्रवाशांची तपासणी केली जाईल. जास्त प्रवासी असतील, तर अडवले जाणार असल्याचे सांगितले.
कसा घडला अपघात?
छत्रपती संभाजीनगर येथून शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला रविवारी सकाळी मेहकरनजीक शिवणी पिसा गावाजवळ पुलावर भरधाव कार डांबराच्या पॅचवरून उसळून सुमारे ३०० फूट दूर जाऊन उलटल्याने अपघात झाला. यात गाडीचे छप्पर उडून कारमधील १३ प्रवासी रस्त्यावर पडले. त्यात सहा जण जागीच ठार झाले, तर चालकासह सात जण गंभीर जखमी झालेत. मृतांमध्ये दोन बहिणी हौसाबाई बर्वे व प्रमिला बोरुडे यांच्यासह त्या दोघींच्या सुना आणि एक मुलगा आणि एका नातीचा समावेश आहे. या अपघाताचा मुद्दा आमदार संजय रायमुलकर यांनी उपस्थित केला.
पुलावर आहे धोका
आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, समृद्धी महामार्गावर जात असताना शिवणी गावानजीक पुलावर मोठे कचके बाजूला पडलेले आहेत. वाहन स्पीडमध्ये असल्यानंतर ते चालकाच्या लक्षात येत नाही. गाडी पुलावर गेली की वाहनचालकाचे नियंत्रण सुटते. त्यामुळे गाडीने चार पलट्या घेतल्या. मी सभागृहाला विनंती करतो की, असे काही अपघातप्रवण स्थळ आहेत. त्यांची चौकशी करून दे दुरुस्त करणार आहात का? या अपघातात जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करणार का, असा सवाल त्यांनी केला.
देसाईंनी केले निवेदन...
मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर निवेदन केले. ते म्हणाले, या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. अपघात सकाळी आठ वाजून पाच मिनिटांच्या सुमारास झाला. वाहनात जवळपास १३ व्यक्ती प्रवास करत होत्या. वाहनाची क्षमता सात व्यक्तींची होती. ओव्हरस्पीड आणि चालकाचे नियंत्रण सुटणे ही अपघाताची सकृतदर्शनी कारणे दिसत आहेत. तरी सुद्धा मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याच्या अनुषंगाने सर्व बाबी तपासून उचित कार्यवाही केली जाईल.
प्रश्न गांभीर्याने घ्या...
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघेही सभागृहात आहेत. सदस्यांनी असा मुद्दा मांडला की, समृद्धी महामार्गावर एक ब्रीज आहे. त्या ब्रीजजवळ आली की गाडी जंप घेते आणि तिथे चालकाचे नियंत्रण सुटते. अपघात होतात. त्यामुळे मंत्रीमहोदयांकडे उत्तर देण्याचा अधिकार आहे. आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जिथे कुठे तशा जागा असतील, त्या दुरुस्त कराव्यात. विधानसभेच्या सदस्याने दिलेली माहिती आपण खरी समजतो. गांभीर्याने घेतो. माणसे मरत आहेत. समृद्धी मार्गावर काही ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. ते कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलणार का, महिन्याच्या आत हे काम होईल, असा शब्द आपण द्याल का, असा सवाल त्यांनी केला.
सुधारणा सुरू आहे...
अजित पवारांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधीपक्षनेत्यांनी मांडलेला मुद्दा गंभीर आहे. या महामार्गावर काही स्पॉट असे तयार झालेत की तिथे अपघात होत आहेत. मुळात समृद्धी महामार्ग सरळ आहे. त्याला वळणे कमी आहेत. काही स्पॉटवर मध्यंतरी माकडांचा वावर होता. अशा स्पॉटची माहिती गोळा केली आहे. सुधारणा सुरू आहे. त्याच्यावर इंटलिजेंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावत आहोत. त्यामुळे ओव्हर स्पीड, अपघात घडेल असा स्पॉट तयार झाला असेल, तर त्याची पूर्वसूचना देता येईल. कालच्या घटनेनंतर अशा सूचना दिला आहेत की, गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असले, तर त्यांना एंट्री करतानाच हटकले जाईल. एंट्री करताना टोलवरूनच होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.