आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासाचा वेळ व पैसा वाचणार:समृद्धी महामार्गाशी नांदेडलाही जोडणार, 6,500 कोटींच्या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी, हिंगोली व परभणी जिल्ह्यांनाही लाभ

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड शहराला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडण्यास राज्य शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. एकूण सुमारे ६,५०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प साकारला जाणार आहे.

महामार्गाच्या बांधकामासाठी तांत्रिक-अभियांत्रिकी व वित्तीय सुसाध्यतेसह सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास गुरुवारी बैठकीत मंजुरी मिळाली. चव्हाण म्हणाले, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला नांदेड शहर जोडण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. निर्णयानुसार महामार्गावरील जालना टी पॉइंटपासून नांदेड शहरापर्यंत द्रुतगती महामार्गाचे बांधकाम होणार आहे. नांदेड-जालना या समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकचा भाग म्हणूनच नांदेड शहरातही रस्ते तयार होतील. या नवीन रस्त्यांच्या व पुलाच्या वापरासाठी नांदेडकरांना टोल द्यावा लागणार नाही.

प्रवासाचा वेळ व पैसा वाचणार
या प्रकल्पाने नांदेडसह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांनाही समृद्धी महामार्गाला थेट व वेगवान कनेक्टिव्हिटी मिळेल. समृद्धी महामार्ग जेएनपीटीशी जोडला जाणार असल्याने या जिल्ह्यांतील माल आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कमी वेळेत पोहोचवता येणे शक्य होईल. तसेच नांदेड-मुंबई, नांदेड-औरंगाबाद प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसे वाचणार आहेत. जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाची एकूण लांबी १९४ किमी असून त्यासाठी अंदाजित खर्च ५,५०० कोटी रुपये असेल.

बातम्या आणखी आहेत...