आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे भरती आंदोलन प्रकरण:राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाकडून पुन्हा अजामीनपात्र वॉरंट; 11 जुलैला हजर राहण्याचे आदेश

सांगली / मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध असेच दोन वॉरंट जारी करण्यात आले होते. गेल्या महिन्यात बीडच्या परळी जिल्हा न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. राज ठाकरेंना 11 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी 28 एप्रिल 2002 रोजी राज ठाकरे यांच्यासह 10 जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. याप्रकरणी 8 जूनला सुनावणी झाली असता राज ठाकरे गैरहजर राहिले. यानंतर कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे.

सांगली कोर्टाने बजावले वॉरंट

सांगली कोर्टातून हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. याआधी, सांगली कोर्टातूनच राज ठाकरेंविरोधात दुसरे अजामीनपात्र वॉरंट 6 एप्रिल रोजी जारी करण्यात आले होते. हे अजामीनपात्र वॉरंट 2008 च्या एका प्रकरणात जारी करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 143, 109, 117 आणि बॉम्बे पोलिस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सांगलीच्‍या शिराळा कोर्टाने 2008 च्‍या एसटी बस तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंना वॉरंट बजावले आहे. आतापर्यंत राज ठाकरे यांच्याविरुद्ध तीन अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत.

बीड कोर्टाने बजावले होते वॉरंट

सांगली न्यायालयाने बजावलेल्या वॉरंट आधी, बीडच्या परळी जिल्हा न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मराठी बोर्डाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी आंदोलन केले होते. या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. या प्रकरणी परळीच्या न्यायालयाने मुंबई पोलिसांना पत्र पाठवले होते. असे असतानाही पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर अखेर कोर्टात त्यांच्याविरुद्ध दुसरे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण

2008 साली मध्ये रेल्वेची भरती प्रकिया सुरू असताना स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या. अशी मागणी करत राज ठाकरेंनी मुंबईत आंदोलन केले होते. कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडे होते. परवानगी नसतानाही बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलिस ठाण्यात राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह 10 मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...