आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार संजय गायकवाड यांची शेतकऱ्याला शिवीगाळ:'मी 40 वर्षे काम केले, तू मला शिकवतोय का?', ऑडिओ क्लिप व्हायरल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गटाचे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये संजय गायकवाड एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत असल्याचे समोर आले आहे.

ऑडिओ क्लिपनुसार उपसा जलसिंजन योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत अनिल गंगितरे या शेतकऱ्याने आमदार संजय गायकवाड यांना फोन केला होता. बोदवड उपसा जलसिंजन कधी पूर्ण होणार?, असा सवाल या शेतकऱ्याने केला होता.

प्रश्नामुळे आमदार वैतागले

शेतकऱ्याच्या प्रश्नावर संजय गायकवाड चांगलेच वैतागले. त्यांनी प्रथम शेतकऱ्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. संजय गायकवाड शेतकऱ्याला म्हणाले, बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 1100 कोटींचा निधीही मी मंजूर करुन घेतला आहे. आता फक्त निविदा निघण्याची प्रक्रिया सुरु आहे. मार्च महिन्यात योजनेचे काम सुरुही होईल. त्यामुळे तुम्ही आता काहीतरी नौटंकी करुन राजकारण करु नका.

यावर शेतकऱ्याने आपण नौटंकी करत नसल्याचे सांगितले. तसेच, रखडलेले काम, निविदा याबाबत आपल्याला अधिकाऱ्यांनीच माहिती दिल्याचे सांगितले. त्यामुळे संजय गायकवाड यांच्या संतापाचा पारा आणखीच चढला आणि त्यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ केली.

ऑडिओ क्लिप आपलीच - संजय गायकवाड

दरम्यान, या ऑडिओ क्लिपबाबत प्रसारमाध्यांना दिलेल्या प्रतिक्रियेत संजय गायकवाड यांनी ही ऑडिओ क्लिप आपलीच असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण या योजनेबाबत नागरिकाशी अर्धा तास बोललो. मात्र, प्रसार माध्यमांत केवळ दोन मिनिटांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, असेही संजय गायकवाड म्हणाले.

व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संभाषण

संजय गायकवाड – तुम्हाला समजतं का बाबा का काही? समजत नसेल तर हे तमाशे बंद करा. नाटकं बंद करा

अनिल गंगित्रे – तमाशाचं कामच नाही साहेब, आम्हाला माहिती आहे.

संजय गायकवाड – तुमच्याकडे चुकीची माहिती दिली. माझ्याकडे या मी तुम्हाला दाखवतो सर्व रेकॉर्ड्स

अनिल गंगित्रे – अधिकारी आम्हाला चुकीची माहिती कशी देतील. ते काम करतायत त्यावर ते कशी चुकीची माहिती देणार ते सांगा.

संजय गायकवाड – अरे कोणता अधिकारी नाव सांग तू

अनिल गंगित्रे – साहेब नाव कसं काय सांगणार. ते आम्हाला सहकार्य करतात आणि आम्ही तुम्हाला त्यांच नाव सांगायचं. त्यानंतर तुम्ही त्यांच्यावर चढायचं. असं थोडी होतं. तुम्ही पण प्रयत्न करताय आम्ही पण प्रयत्न करतोय.

संजय गायकवाड – ही पद्धत नाही ना नौटंकी करायची.

अनिल गंगित्रे – साहेब, नौटंकी तुम्हाला वाटतेय पण, आम्हाला त्रास भोगावा लागतोय. म्हणून आम्ही इथे आलो.

संजय गायकवाड – ही तुमची शंभर टक्के नौटंकीच आहे. तुम्हाला योजना समजत नाही.

अनिल गंगित्रे – साहेब मी पण विचारलं आहे. ते स्ट्रक्चर मिरी ऑफिसला नाशिकला अडकलं आहे. ते मंजूर झालं तर टेंडर निघेल. तुम्ही पण माहिती घ्या पुन्हा काम करतोय

संजय गायकवाड – चाळीस वर्ष आम्ही काम करतोय तु मला नको शिकवू

अनिल गंगित्रे – कुणी काम केलं नाही म्हणून आम्ही करतोय. मला जर असं वाटलं असतं तुम्ही करताय. प्रोग्रेस दिसली असती तर कशाला आलो असतो.

संजय गायकवाड – तुम्ही केली म्हणता ना (शिवी)

अनिल गंगित्रे – हे शब्द कोणते वापरताय साहेब तुम्ही. मी तुम्हाला शिवी दिली का?

संजय गायकवाड – नीट बोल ना मग

अनिल गंगित्रे – मी शिवी दिली का तुम्हाला?

संजय गायकवाड – अरे तुला ( शिवी)

अनिल गंत्रित्रे – तुम्ही आमदार आहात तुम्हाला समजतंय का तुम्ही कोणती भाषा वापरताय.

संजय गायकवाड – तु मला शिकवतोय का? (शिवी)

अनिल गंगित्रे – तुम्ही असे गैरवर्तणूक करत असाल तर काय लोकांची कामं करत असाल.

संजय गायकवाड – अरे सोड रे तू नको आम्हाला शहाणपणा शिकवू ((शिवी)

(दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही)

बातम्या आणखी आहेत...