आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य सरकार घाबरले आहे. त्यामुळे 1 मे रोजी झालेल्या औरंगाबाद सभेत अटी आणि शर्थींचे उल्लंघन करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. राज्यभरात मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेने आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे बंद होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतलीय. भोंग्याच्या विषयावरून राज्यात वातावरण तापलेले असतानाच आता काँग्रेस नेत्याने महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे.
12 अटींचे उल्लंघन
निरुपम म्हणाले की, राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादेत सभा घेतली होती. या सभेसाठी महाराष्ट्र पोलिसांनी 16 अटी घातल्या होत्या. त्यापैकी 12 अटींचे उल्लंघन केले आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात दोन न्यायालयांचे अजामीनपात्र वॉरंट आहेत. असे असतानाही मुंबई पोलीस काहीच का करत नाहीत, हे मला कळत नाही. सरकारला राज ठाकरेंची भीती वाटत आहे. देशात आणि महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे आणि जो कोणी कायद्याला आव्हान देईल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. राज ठाकरेंना राज्यात जातीय उन्माद पसरवण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. सरकारने घाबरू नये. कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असा राज्यासह देशभरात नियम आहे, असे निरुपम म्हणाले.
उत्तर भारतीयांची माफी मागा
संजय निरुपम म्हणाले की, राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही. भाजप खासदाराच्या या मताशी मी सहमत नाही. कारण, अयोध्याला जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण राज ठाकरे अयोध्येला जात आहेत, म्हणजे ते हिंदुत्वाच्या परंपरेचा स्वीकार करत आहेत आणि उत्तर भारतात जात आहेत. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्यामुळे अयोध्येला जाण्याआधी त्यांनी या लोकांची माफी मागायला हवी आणि आपल्या पापांचे प्रायश्चित्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.