आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इनसाइड स्टोरी:संजय राठोड ‘हिट विकेट’, राजीनामा दिला नव्हे, घेतला; चौकशीनंतर पुनर्वसन होणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनमंत्री संजय राठोड यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला, हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा खोटा आहे. राठोड राजीनामा देण्यास तयार नव्हते, त्यांच्याकडून राजीनामा घेतला गेला, तसेच राठोड यांचे चौकशीनंतर पुनर्वसन केले जाणार असल्याचे पक्षातून सांगण्यात येते.

राज्याचे वनमंत्री व बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांंच्या वर्षा निवासस्थानी आणि सह्याद्री अतिथीगृहावर मोठी ड्रामेबाजी झाल्याचे समजते. राठोड हे वर्षा निवासस्थानी बैठकीला आले असता सोबत पत्नीला घेऊन आले होते. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चौकशी होईपर्यंत राजीनामा राज्यपाल यांच्याकडे पाठवू नये, अशी त्यांनी उद्धव यांना विनंती केली. राठोड निष्कलंक आहेत हे बिंबवण्यासाठी राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र पत्रकार परिषदेत वाचून दाखवले गेले. तसेच पूजा चव्हाण हिचे वडील लहुचंद्र, आई मंदोदरी आणि बहीण देवयानी यांना सह्याद्री अतिथीगृहावर आणण्यात आले. त्यांनी एक पत्र लिहून दिले असून आमची राठोडांबाबत तक्रार नाही, असा मजकूर त्यात आहे. हे पत्र पत्रकार परिषदेत वाचून दाखवले.

रात्री साडेआठ पर्यंत मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाने संजय राठोड यांचा राजीनामा राजभवनकडे सुपूर्त केलेला नव्हता. राठोड यांचे काढलेले वन मंत्रालय मुख्यमंत्री यांनी स्वतःकडे ठेवले आहे. याचाच अर्थ राठोड यांना क्लिनचीट मिळाल्यानंतर पुनर्वसन होऊ शकते, अशी शिवसेनेतील सूत्रांची माहिती आहे.

शिवसेनेत राठोड प्रकरणी दोन मतप्रवाह होते. राठोड यांच्या कथित ध्वनिफीत संभाषणबाबतचा फॉरेन्सिक रिपोर्ट अद्याप आलेला नाही, तो आल्यानंतर व गुन्हा नोंद झाल्यावर राजीनामा घ्यावा हा एक मतप्रवाह आणि राठोड यांचा राजीनामा घेतल्याने भाजपचा आत्मविश्वास दुणावेल म्हणून घेऊ नये, असा दुसरा मतप्रवाह होता. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आग्रहामुळे राजीनामा घेतल्याचे सांगण्यात येते. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना पाठीशी घातले. पोहरादेवी येथे गर्दी आपोआप जमली होती, असे उद्धव म्हणाले. तसेच राठोड प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्यास खासदार डेलकर आत्महत्या प्रकरण भाजप नेत्यांवर गुन्हा नोंद होईल, असा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एकूण, शिवसेनेने व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड प्रकरणी गेले तीन-चार दिवस कथानक तयार केल्याचे झालेल्या घडामोडीवरून स्पष्ट झाले.

बातम्या आणखी आहेत...