आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा:कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना राऊतांचा इशारा, आता महाराष्ट्रच मागता काय?- पवार

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यासह सोलापूरमधील काही गावांवर दावा केला आहे. त्यावर मविआ नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी तर थेट महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा इशाराच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

पवारांनी उडवली खिल्ली

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही बोम्मई यांच्या अंगात काही संचारले आहे का? काल सांगलीतील काही गाव, आज सोलापूरातील काही गाव मागताय. उद्या पूर्ण महाराष्ट्र मागायला कमी करणार नाहीत, अशा शब्दांत बोम्मई यांची खिल्ली उडवली आहे.

आधी उद्योग, आता गाव

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषदेत म्हणाले की, मी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा देत नाही. धमकी देतोय. तुमची बकबक बंद करा. हे घेऊ, ते घेऊ हे थांबवा. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. शिंदे सरकार गुडघ्यावर बसले असले तरी शिवसेना स्वाभिमानाने उभी आहे.

संजय राऊत म्हणाले, शिंदे गटातील 40 आमदार आपण स्वाभिमानासाठी शिवसेनेतून बाहेर पडत आहोत, असे म्हणाले होते. आता कुठे आहे तुमचा स्वाभिमान? कुठं शेण खातोय तुमचा स्वाभिमान? एक मुख्यमंत्री गाव घेत आहे. एक उद्योग घेतो आहे अन् षंढासारखे बसला आहात तुम्ही?

सरकार कोणाचे? महत्त्वाचे नाही

संजय राऊत म्हणाले, मी वारंवार सीमाभागात गेलो होतो. शिंदे सरकारमधील किती मंत्री बेळगाव, निपाणी आणि कारवार, खानापूर, भालकीला गेले? मंत्री चंद्रकांत पाटील जातात आणि कन्नड राष्ट्रगीत म्हणतात. आमच्या जखमेवर मीठ चोळतात. पण आम्ही लढू. राज्यात कुणाचे सरकार आहे हे महत्त्वाचे नाही. आमचे सरकार असते तरी आम्ही आवाज उठवला असता.

राज्याच्या वर्मावर घाव

संजय राऊत म्हणाले, शिंदे केवळ महाराष्ट्रातून एकही गाव जाणार नाही, असे म्हणत आहेत. केवळ असे बोलून चालणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला आहे. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांची अशी हिंमत झाली नव्हती. महाराष्ट्रातील सरकार मिंधे असेल पण आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रावर आलेलं संकट परतवून लावू.

महाराष्ट्राल काय समजता?

राष्ट्रवादी काँग्रेसची आज प्रदेश कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत असून या बैठकीला आले असता अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा- तसा वाटला का? तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? असा रोखठोक आणि संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.

अजित पवार म्हणाले, सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्य करणे ताबडतोब थांबवावे. त्यांचे हे वक्तव्य निंदनीय असून त्याचा कठोर शब्दांत निषेध केला पाहीजे.

केंद्राने हस्तक्षेप करावा

केंद्राने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला. प्रत्येक राज्याचा अस्मितेचा प्रश्न असतो. अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याला एकसंघ ठेवण्याचा काम केले आहे. आता काहीही कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका मांडली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.

फक्त मुंबई मागणे बाकी

अजित पवार म्हणाले की, लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे काय माहित. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक शब्दात त्यांना सुनावले पाहिजे. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे, असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...