आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप आमदार राहुल कुल यांच्यावर संजय राऊत यांच्याकडून 500 कोटींच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याकडून कारखान्याकडून शेतकऱ्यांची लूट झाली असून 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
राऊतांचे पत्र जशास तसे
विषय 'भीमा सहकारी साखर कारखाना लि. ने केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची चौकशी होण्याबाबत
जय महाराष्ट्र!
आपल्या नेतृत्वाखालील सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले आहे व त्याबद्दल आपले अभिनंदन भारतीय जनता पक्षाचे काही नेते जे आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात, ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांचे साखर कारखाने याबाबत भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत व या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही लावला जातो. भ्रष्टाचारास धर्म व राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणे गरजेचे आहे. या मताचा मी आहे.
पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील 'भीमा सहकारी साखर कारखाना लि. ने गेल्या काही वर्षांत केलेल्या भ्रष्टाचार गैरव्यवहाराचे प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे 500 कोटी रुपयांचे 'मनी लाँडरिंग आहे. कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे व तपास यंत्रणांच्या धाडी त्या संदर्भात पडत आहेत. पण दौडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे.
भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सुत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत. पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसलेत. जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार या कारखान्यात झाली आहे. हे सर्व प्रकरण तत्काळ 'ईडी' व 'सीबीआय'च्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी. या प्रकरणाचा सविस्तर तपशील सोबत जोडत आहे. असे पत्र खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहले आहे. या प्रकरणी आता राहुल कुल यांच्यावर काय कारवाई होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर यावर भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.