आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांची टोलेबाजी:आमच्याकडे ईडी दिली तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, पंकजा मुंडेंचीही आम्हाला चिंता

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्याकडे 48 तास ईडी दिली तर भाजपचे आमदारच काय, देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील. भाजपने ईडीची भीती दाखवल्यामुळेच मविआला मते देणारे अपक्ष आमदार फुटले, असा दावा आज संजय राऊत यांनी केला. तसेच, राज्यसभा निवडणुकीत रात्री भाजप नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला फोन केले. गृहमंत्रालयाकडून निवडणूक आयोगाला फोन गेले. मविआचे कोणते उमेदवार बाद करायचे, यावर चर्चा झाली, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.

विधान परिषदेसाठी घोडेबाजार सुरु

राज्यसभा निवडणुकांची मांडवपरतणी सुरू असतानाच भाजपच्या मांडवात विधान परिषदेचे 11 उमेदवार उभे राहिले आहेत. मतांचे गणित हाताशी नसताना भाजपने दोन जास्त उमेदवार उभे करावे याचा अर्थ त्यांना घोडेबाजारात हरभरे टाकायचे आहेत व महाराष्ट्राचे वातावरण बिघडवायचे आहे, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रासह देशभरात राज्यसभा निवडणुका पार पडल्या. दिल्लीतील सत्ताधारी पक्ष अशा निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर किती बेमालूमपणे करतो हे यानिमित्ताने पुन्हा दिसले. महाराष्ट्र आणि हरियाणात ते दिसले, असा आरोप राऊत यांनी केला. राज्यसभा आणि विधान परिषदा मिळून किती कोटींचा धूर निघाला?, यावर पैजा लागल्या आहेत. विधान परिषद व्हायची आहे, पण भाजपचा करेक्ट कार्यक्रम सुरू झाला आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर

राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सहापैकी तीन जागा भाजपने जिंकल्या. महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या. सहाव्या जागेवर सहज विजय मिळेल इतके संख्याबळ दोन्ही बाजूला नव्हते. त्यामुळे त्या जागेसाठी काट्याची टक्कर झाली. सहावी जागा व्यापारी व बीओटी तत्त्वावर लढली गेली. दिल्लीत व्यापाऱ्यांचे राज्य आल्यापासून त्यांनी निवडणुका महाग तर केल्याच, पण निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू झाला. तरीही शिवसेनेने एक सामान्य कार्यकर्ता संजय पवार यास सर्व ताकदीनिशी उमेदवारी दिली व लढवले. धनशक्ती व केंद्रीय यंत्रणांपुढे त्यांना हार पत्करावी लागली, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

पैशांचा प्रचंड वापर

राज्यसभा निवडणुकीत लोकशाही मारण्यासाठी धनशक्तीचा कसा वापर होतो हे राजस्थानात दिसून आले. एकदा हरयाणातून राज्यसभेवर जिंकून आलेले सुभाष गोयल यांना भाजपने राजस्थानात निवडणूक लढविण्यासाठी पाठविले. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पाडावेत यासाठीच हा सर्व खेळ होता. पैशांचा प्रचंड वापर तेथे झाला, असा दावा राऊत यांनी केला.

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे एक उमेदवार निवडून येण्यासाठी कोटी कोटींची भाषा करतात. काल ते वेगळ्या पक्षात होते. तेथे भरपूर पैसे कमावले व भाजपमध्ये गेले. भाजप आज अशाच लोकांचा पक्ष बनला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांचे मुखवटे गळून पडले. विधान परिषद निवडणुकीत ते मुखवटे साफ फाटतील, असे राऊत म्हणाले.

फडणवीसांना स्वत:ची फळी उभी करायची आहे

विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे व त्या फळीत जुन्या निष्ठावान भाजप पदाधिकाऱ्यांना स्थान दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतून आलेल्यांची मोट बांधली. त्यांना राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत उमेदवाऱ्या सहज मिळाल्या. सदाभाऊ खोत, पडळकर, लाड, बोंडे यांना उमेदवारी मिळते, पण खडसे यांना पक्ष सोडावा लागतो व मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते, अशी टीका राऊतांनी भाजपवर केली. तसेच, गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे जवळचे संबंध होते. त्यामुळे पंकजा मुंडेंची आम्हाला चिंता वाटते, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

संभाजीराजेंना उमेदवारी का नाही?

शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी न दिल्याचे फळ त्यांना मिळाले, असे भाजप व फडणवीस यांच्यातर्फे सांगितले गेले. मग धनंजय महाडिकांच्या जागी भाजपने संभाजीराजे यांना अपक्ष उमेदवार बनवून राज्यसभेसाठी का विजयी केले नाही?, असा सवाल राऊत यांनी केला आहे. सर्वच गोष्टींचे राजकारण व राजकारणाचा व्यापार करायचा हे त्यांचे धोरण. विधान परिषदेची निवडणुकही त्यांनी तागडीवरच ठेवली आहे. केंद्रीय यंत्रणांची लाठी-काठी वापरून निवडणूक जिंकावी, हाच भाजपचा प्रयत्न असल्याचे राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...