आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाईक-ठाकरे कुटुंब जमीन व्यवहार:किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर नाईक कुटुंबियांनी दिले स्पष्टीकरण, तर संजय राऊत म्हणाले...

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ठाकरे कुटुंबीयांसोबत आम्ही केलेल्या जमिनीच्या व्यवहारामध्ये गुपित काहीच नाही - आज्ञा नाईक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या कुटुंबीयांनी नाईक कुटुंबीयांकडून कोकणात जमीन खरेदी केल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. यानंतर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला. रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्यामुळे अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या केल्याचा आरोप असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब यांना अटक करण्यात आली आहे. आता या जमीन व्यवहारावर नाईक कुटुंब आणि संजय राऊतांनी उत्तर दिले आहे.

नाईक कुटुंबाने दिले स्पष्टीकरण
जमीन व्यवहार झाल्याच्या किरीट सोमय्यांच्या आरोपांवर बोलताना अन्वय नाईक यांची कन्या आज्ञा नाईकने खुलासा केला आहे. 'ठाकरे कुटुंबीयांसोबत आम्ही केलेल्या जमिनीच्या व्यवहारामध्ये गुपित काहीच नाही. हा व्यवहार उघढ आहे. सोमय्यांनी दाखवलेला सातबारा हा सर्वांसाठी खुला असतो. 'महाभूमी' वेबसाइटवर देखील माहिती आहे. सोमय्यांना आणखी काही माहिती असेल तर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत,' असा टोला आज्ञा नाईकांनी लगावला आहे.

पुढे बोलताना आज्ञा नाईक म्हणाल्या की, 'जमीन कोणी विकत देऊ शकत नाही का? योग्य मार्गाने झालेला हा व्यवहार आहे. यामध्ये किरीट सोमय्यांना नेकमी काय समस्या जाणवतेय. या व्यवहाराचा आत्महत्या प्रकरणाशी काय संबंध आहे. किरीट सोमय्यांना नेमकेकाय दाखवायचे आहे?' अशी विचारणा आज्ञा नाईकांनी केली आहे. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, 'किरीट सोमय्यांना काही मदत हवी असेल तर मी स्वत: हजर होईल, तुम्ही कधीही बोलवा'

संजय राऊत म्हणाले....
किरीट सोमय्यांच्या आरोपांवर संजय राऊतांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, 'अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून!'

किरीट सोमस्यांनी कोणते आरोप लावले होते?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा आणि वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा किल्ल्यानजीक कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली आहे. माझी सासुरवाडी तेथून जवळच आहे, त्यामुळे आपणाला त्याची माहिती आहे, असा दावा सोमय्या यांनी केला होता.

जमीन व्यवहाराचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख
जमिनीचा व्यवहार उघड आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख आहे. ठाकरे आणि नाईक यांचा काहीएक संबंध नाही. नाईक यांचा माझ्याशी संबंध आहे, जी चौकशी करायची ती करा, असे आव्हान शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी दिले आहे. तर पत्रकार अर्णब गोस्वामी यांना वाचवण्याकरिता मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत आहेत, असा प्रत्यारोप परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला.

जमीन खरेदी व्यवहार 2 काेटी 20 लाखांचा
सन 2014 मध्ये व्यवहार

21 मार्च 2014 रोजी ठाकरे परिवाराकडून या व्यवहारापोटी नाईक कुटुंबीयांना 2 कोटी 20 लाख रुपये देण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

ठाकरे-वायकर संयुक्त सातबारा
जमीन खरेदी व्यवहारातील सातबारा संयुक्त आहे. नाईक परिवाराचे आपण समजू शकतो, पण ठाकरे आणि वायकर या दोघांनी मिळून हा व्यवहार का केला? हे दोघे कसे एकत्र? अर्णब प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात एवढी तत्परता दाखवण्यामागील कारण समोर यायला हवे, असे सोमय्या म्हणाले.

  • वायकर आणि ठाकरे यांनी कोकणात संयुक्तपणे जमीन खरेदी केल्याचे यापूर्वी आरोप झालेले आहेत. मात्र ती जमीन अर्णब गोस्वामी प्रकरणात आत्महत्या केलेले अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केल्याचा दावा प्रथमच होतो आहे.
  • सोमय्या यांनी मुंबई महापालिकेतील युती फिस्कटल्यानंतर उद्धव यांची ‘वांद्र्याचा माफिया’ अशा शब्दांत हेटाळणी केली होती. त्यानंतर सन 2019 मध्ये सोमय्या यांचे लोकसभेचे तिकीट कापण्यात आले होते हे उल्लेखनीय.