आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घणाघात:अजित पवार स्वाभिमानी, ते मिंध्यांसारखे मांडलिक होणार नाहीत; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशपातळीवर विरोधक एकत्र होत असून राज्यात भाजपचे नामोनिशाण राहणार नाही. अजित पवार स्वाभीमानी, बाणेदार असून त्यांचा कणा ताठ आहे. ते मिंध्यांसारखे मांडलिक म्हणून कुणाचे काम करणार नाही असा घणाघात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार भाजपमध्ये जाणार नाही

संजय राऊत म्हणाले, अंजली दमानियांना भाजपकडून ही माहिती मिळाली ती त्यांनी जाहीर केली असेल. अजित पवार आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांचे राजकीय भविष्य उज्वल आहे. त्यांचे नेतृत्व बाणेदार आहे. ते भाजपमध्ये जातील असे वाटत नाही.

भाजपचे नामोनिशाण राहणार नाही

संजय राऊत म्हणाले, नाना पटोले काय बोलले हे मला माहीत नाही. पण कालच माझी शरद पवारांसोबत चर्चा झाली. त्यांचे मार्गदर्शनपर मत जाणून घेतली. त्यांचे मत आहे की, मविआ अभेद्य असावी. लोकसभा आणि इतर निवडणुकीसाठी एकत्र असावे. भाजपचे नामोनिशाण राहणार नाही. महाराष्ट्रातील जनता वेगळ्या मुडमध्ये आहे त्यांना राज्यातील सत्ता गमवावी लागेल.

आमची आघाडी अभेद्य

संजय राऊत म्हणाले, अजित पवार स्वाभीमानी आहे, त्यांचा कणा नेहमी ताठ असतो. ते मिंध्याप्रमाणे निर्णय घेणार नाही. अजित पवार मांडलिक म्हणून कुणाचे काम करतील हे वाटत नाही. मविआचे पालक शरद पवार आहेत. काॅंग्रेस एनसीपी शिवसेनेची आघाडी फेविकाॅलचा जोड आहे आघाडी तुटणारी नाही. नागपूरला मविआची रॅली सोळा तारखेला आहे. त्यापूर्वीच आम्ही यासंबंधी चर्चा करू, आम्ही सर्व एकत्र आहोत आणि राहू.

..म्हणून अजित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले

संजय राऊत म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांवर संकट आले आहे. अवकाळी, गारपिटीचा पीक, फळबागांना फटका बसला आहे. विरोधी पक्षनेत्यांचे काम आहे की, विरोधी पक्षांच्या मागण्या सरकारच्या कानावर घालणे त्यासाठीच अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि फडणवीस यांची भेट घेतली.

विरोधी पक्षांची एकजूट होतेय

संजय राऊत म्हणाले, खर्गे असो की, राहूल गांधी आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. आम्ही मानतो की, पूर्ण देशात विरोधीपक्षांची एकजूट होईल. नितीश कुमार वरिष्ठ नेते आहेत ते उद्धव ठाकरेंना भेटतील. नितीश कुमार - तेजस्वींची युती मजबूत आहे. येत्या विधानसभेत ते जादू दाखवतील.

2024 ला सत्ता काबीज करू

विरोधीपक्ष एकत्र आहे. आम्ही राज्यात व देशस्तरावर एकत्रित आहोत. कुणी काहीही वावड्या उठवत असेल तर ते चूक आहे. भाजपला केवळ आव्हानच नाही तर 2024 ची सत्ता आम्ही काबिज करू अशा प्रकारे आम्ही युती बनवत आहोत. महाराष्ट्रात काही प्रमुख ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभा होतील. जळगावातही सभा होणार आहे.