आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात सध्या हिंदुत्व आणि हनुमान चालीसावरून वातावरण तापलेले आहे. शिवसेना विरुद्ध मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप असा सामना पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जागतिक व्यंगचित्रकार दिनावर भाष्य करत राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार टीका केली. संजय राऊत आज पुण्यात सभा घेणार आहेत. यावेळी मनसे सोडलेल्या काही नेत्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमही पार पडणार आहे. पुण्याकडे रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
राज ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार, पण भाजपने हात कलम केले
शिवसेनाप्रमुख म्हणून सर्वज्ञात असलेले बाळासाहेब ठाकरे हे एकेकाळी राष्ट्रीय पातळीवरील एक अग्रगण्य व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबानंतर राज ठाकरे हे एक उत्तम व्यंगचित्रकार होते. मात्र, भाजपने त्यांचे हात कलम केले आहेत. आता राज ठाकरेंनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्याचे राजकारण सुरू केले आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी निशाणा साधला.
100 संपादकीयांची ताकद एका व्यंगचित्रात
आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. जेव्हा सोशल मीडिया, टेलिव्हिजन नव्हते त्याकाळात एडिटर आणि व्यंगचित्रकारांची ताकद होती. 100 संपादकीयमध्ये जी ताकद नाही ती एका कार्टुनमध्ये होती. बाळासाहेब ठाकरेंनीही आपल्या कुंचल्यातून वेळोवेळी राजकीय परिस्थितीवर भाष्य करुन समाज प्रबोधनाचं काम केले आहे. बाळासाहेबांनी व्यंगचित्र काढून महाराष्ट्रासह देशातही सत्ता परिवर्तन केलं. बाळासाहेबांसारखा व्यंगचित्रकार निर्माण व्हावा, यासाठी आमची प्रार्थना आहे. पण त्यांच्यासारखी क्षमता असणाऱ्यांनी भोंग्यांच्या राजकारणात रस आहे. त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचं राजकारण सुरू केलं आणि ते आता हिंदुच्याच गळ्याशी आले आहे, असे राऊत म्हणाले.
भोंग्यांचा हिंदूंवर बुमरँग
कुणी कितीही भोंगे वाजवले तरी शिवसेनेला फरक पडत नाही. मशिदीवरील भोंग्यांच्या राजकारणामुळे आज हिंदुनाच त्रास होत आहे. शिर्डी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी काकडा आरत्या बंद करण्याची वेळ आली आहे. भोंग्यांच्या प्रकरणात लाखो हिंदूंनी आमच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. मशीदींवरच्या भोंग्यांच्या राजकारणामुळे हिंदूंचा संताप होत आहे. मनसेमुळे भोंग्यांचे राजकारण हिंदूंवर बुमरँग होत आहे, असेही राऊत यांनी म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.