आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजित पवारांचे राजकारणातील अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे हे आहे. तर सुप्रिया सुळे यांचा दिल्लीतला वावर चांगला आहे. असे म्हणत पक्षाचे अध्यक्षपद निवडताना काळजी घ्यावी लागेल, असे सूचक विधान ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आले आहे.
शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण याकडे राज्याचे लक्ष आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळे की अजित पवार अशा चर्चा रंगल्या आहेत.
अग्रलेखात नक्की काय?
राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षावर कोण? अशा चर्चा रंगलेल्या असताना सामना वृत्तपत्राद्वारे यावर सूचक विधान करण्यात आले आहे.
या अग्रलेखानुसार, "अजित पवारांचे राजकारणातील अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे आहे. सुप्रिया सुळे दिल्लीत असतात. त्यांचा तेथील वावर चांगला आहे. संसदेत त्या उत्तम काम करतात, मात्र भविष्यात त्यांना पक्षाचे नेतृत्व मिळाले, तर वडिलांची उंची गाठण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. पवारांनी राजीनामा देताच अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या प्रसंगावरही यात बोट ठेवण्यात आले आहे.
शरद पवार राजकारणातील भीष्म
शरद पवार राजकारणातील भीष्म आहेत, पण भीष्माप्रमाणे आपण शरपंजरी पडलेले नसून सूत्रधार आपणच आहोत, हे त्यांनी दाखवून दिले आहे, असे भाष्यही यात करण्यात आले आहे.
हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत विषय असला तरी शरद पवार या घडामोडींचे नायक आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रात हालचाली सुरूच राहतील.
अजित पवारांची वेगळी भूमिका
अजित पवार किंवा त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडविण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले काय? असा सवालही या प्रकरणी उपस्थित करण्यात आला आहे. पवारांनी राजीनामा देताच त्यांची मनधरणी सुरू झाली. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी होत असताना अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली. पवारसाहेबांनी राजीनामा दिला. ते मागे घेणार नाहीत. त्यांच्या संमतीने दुसरा अध्यक्ष निवडू असे अजित पवार म्हणतात. अजित पवारांचे राजकारणातील ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे आहे असेही यात नमूद करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.