आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घमासान:संजय राऊतांचा सवाल; चंद्रकांत पाटलांचा दावा शिंदेंना मान्य आहे का? खऱ्या आईचे दूध प्यायले असेल तर राजीनामा द्यावा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबरी पाडली त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही. बाबरी पाडण्यात बाळासाहेबांची कोणतीही भूमिका नव्हती, असा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे.

चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा

चंद्रकांत पाटलांनी केलेला दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का ?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. एकनाथ शिंदेंना हा दावा मान्य नसेल तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, मिंधे गटात कोणी खऱ्या आईचे दूध प्यायलेला आहे का जो शिवसेना प्रमुखांच्या अपमानाविरोधात मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे आव्हानही संजय राऊतांनी दिले आहे.

सरकार जमा मिंधे आता काय करणार?

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुंत्वाच्या विचाराचे आम्हीच पाईक आहोत असे बोलणारे सरकार जमा 40 मिंधे आता काय करणार? काल याच बाळासाहेब विरोधकांच्या चड्डीची नाडी पकडून ते अयोध्येत जाऊन आले. आता साहेबांच्या अपमाना विरोधात कोण दांडका उचलणार?

शिवसेना संपवण्याचा डाव

संजय राऊत म्हणाले की, भाजपला शिवसेनेचे अस्तित्व संपवायचे आहे. त्यामुळेच चंद्रकांत पाटलांनी जाणुनबुजून हे वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या मुखातून भाजपच बोलला आहे. नाहीतर एवढ्या वर्षांनी चंद्रकांत पाटील यांना बोलण्याची गरज काय होती? गद्दारांच्या मदतीने शिवसेनेला नष्ट करण्याचे हे प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. याचा निषेध म्हणून शिंदे गटाचा एकजण तरी राजीनामा देईल का?

शिंदे गट हा भाजपचा गुलाम

संजय राऊत म्हणाले, हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली, असे शिंदे गट सतत म्हणत असतो. आता चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसले आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे चंद्रकांत पाटलांना खडेबोल सुनावण्याची हिंमत दाखवणार नाहीत. कारण एकनाथ शिंदे हे गुलाम झाले आहेत. गुलाम आपल्या मालकाविरोधात कधीही बोलत नाहीत.

बाळासाहेबांच्या त्यागावर भाजप उभा

संजय राऊत म्हणाले, बाबरी तोडल्यानंतर भाजपने या घटनेसाठी आपण जबाबदार नसल्याचे म्हटले होते. बाबरी तोडल्यानंतर भाजपने पलायन केले, हा इतिहास आहे. मात्र, आम्ही पळकुटे नव्हते. बाळासाहेब ठाकरे तसेच लालकृष्ण अडवाणी यांनी हिंदुत्वासाठी जो त्याग केला, त्या त्यागावरच आज भाजप उभा आहे. तोच भाजप आज बाळासाहेबांवर चिखल उडवत आहे आणि त्याच चिखलात मिंधे सरकार बसले आहे. शिंदे गटाला आता हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. आम्ही सत्तेचे, भाजपचे गुलाम झालो आहोत, असे शिंदेंनी जाहीर करून टाकावे.

हजारो शिवसैनिक अयोध्येला गेले होते

दरम्यान, बाबरी प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले छत्रपती संभआजीनगरचे माजी खासदार मोरेश्वर सावे यांनीही या घटनेत बाळासाहेबांच्या सहभागाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.​​​​​​ बाबरी प्रकरणात मोरेश्वर सावे यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक प्रमोद माने यांनी सावे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत मोरेश्वर सावे यांनी म्हटले होते की, ‘बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी एकही हिंदुत्ववादी संघटना पुढे आली नव्हती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी होय, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे, असे ठणकावून सांगितले. या कारसेवेत मी आणि ठाण्याचे खासदार सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक अयोध्येला गेले होतो. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हाही हे शिवसैनिक सहभागी होते.' मोरेश्वर सावे यांनी बाबरी पाडण्याच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. चंबळ खोऱ्यात त्यासाठी बैठका झाल्याचे त्यांनी सांगितले होते. या सगळ्या नियोजनाची माहिती बाळासाहेब ठाकरे यांना दिली जायची, असेही मोरेश्वर सावे यांनी सांगितले होते.

उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी एक वाजता मातोश्री येथे पत्रकार परिषद घेणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सर्व प्रकरणावर काय बोलणार?, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

संबंधित वृत्त

नव्या वादाला तोंड:बाबरी पाडण्यात एकही शिवसैनिक नव्हता, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य; बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

बाबरी आम्ही पाडली, असे छातीठोकपणे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या दाव्यावर त्यांच्या पश्चात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य त्यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाचा सविस्तर