आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप आणि शिंदे गट सावरकरवादी असूच शकत नाही. त्यांनी काढलेली 'सावरकर गौरव यात्रा' केवळ ढोंग आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.
सावरकरांचा हिंदूत्ववाद विज्ञाननिष्ठ
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, सावरकरांनी या देशाला एक दिशा दिली आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन दिला आहे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याचा महत्त्वाचा संदर्भ दिला. भाजप गायला गोमाता मानते. मात्र, सावरकरांना ते मान्य नव्हते. गाय उपयुक्त पशू आहे. जर गाय दूध देण्याची थांबली तर तिचे गोमांस खायला हरकत नाही हा सावरकरांचा विचार होता. हा भाजपाला मान्य आहे का?, असा प्रश्न संजय राऊतांनी केला आहे.
मारुती कांबळेचे काय झाले?
‘मारुती कांबळेचे काय झाले?’ या प्रश्नाप्रमाणे अदानींच्या कंपनीत गुंतवलेले 20 हजार कोटी कोणाचे? हा प्रश्न महत्त्वाचा. सर्वत्र हाच ‘यक्ष’ प्रश्न विचारला जात आहे, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच, आता मोदी, अदानी यांनीच उत्तर देऊन यक्षप्रश्न सोडवावा, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले आहे.
चोरांना चोर म्हणण्याचे स्वातंत्र्य नाही
सामनाच्या आजच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ‘मोदी-अदानी’ ही नावे आता भ्रष्टाचाराची प्रतीके झाली आहेत. राहुल गांधी यांनी चोरांना चोर म्हटले व त्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द केली, दिल्लीतील घर काढून घेतले. ज्या देशात चोरांना चोर म्हणण्याचे स्वातंत्र्य नाही त्या देशाचे नेतृत्व हे चोर आणि दरोडेखोरांच्याच हाती असते.
खऱ्या चोरांना संरक्षण
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे नाते नेमके काय? अदानी यांच्या भ्रष्टाचाराचे संरक्षक म्हणून पंतप्रधान पहाडासारखे का उभे आहेत? अदानी यांच्या कंपनीत बेकायदेशीरपणे गुंतवलेले 20 हजार कोटी रुपये नक्की कोणाचे? असे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे निदान ‘ईडी’ आणि सीबीआयने तरी द्यायला हवीत. मात्र खऱ्या चोरांना संरक्षण व दरोडेखोरांना प्रतिष्ठा देण्याचे काम या दोन्ही संस्था आज करीत आहेत. देशात गरिबी व बेरोजगारांचा आकडा वाढत आहे. गरीबांना अधिक गरीब बनवून त्यांना रेशनवर फुकट 5-10 किलो धान्यांची भीक घालणे याला मोदींचे सरकार प्रगती आणि विकास मानत आहे.
अदानी फक्त चेहरा
संजय राऊत म्हणाले की, 67 वर्षांत देशातील सर्व सरकारांनी मिळून 55 लाख कोटींचे कर्ज घेतले होते, पण ‘मोदी’ सरकारने मागच्या फक्त सात वर्षांतच 85 लाख कोटींचे कर्ज घेतले. या 85 लाख कोटींचा हिशेब मागणाऱ्यांना भ्रष्टाचारी ठरवले जाते. या 85 लाख कोटींची मलई अदानी यांच्या खिशात मोठ्या प्रमाणावर गेली. “अदानी यांची सर्व संपत्ती ही श्री. मोदी यांचीच आहे. अदानी हा फक्त चेहरा आहे. त्यांच्या सर्व संपत्तीचे खरे मालक आपले ‘फकीर’ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत,” असा आरोप श्री. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेत केला. मोदी व त्यांच्या मंडळींचा पैसा अदानी ‘मॅनेज’ करतात व अदानी यांना फक्त 10-20 टक्के – कमिशन मिळते, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल पुराव्यासह करतात व ईडी, सीबीआय त्यावर गप्प बसते. न्यायालये ‘स्युमोटो’ पद्धतीने पुढे जात नाहीत. अशा विकलांग अवस्थेत आज आपला देश आहे.
मोदींचे ढोंग
संजय राऊत म्हणाले की, अदानी केवळ फ्रण्टमॅन आहे व अदानींची संपत्ती ही मोदींचीच आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्याचा पुनरुच्चार करत संजय राऊत म्हणाले की, ज्या देशाच्या पंतप्रधानाला सर्वाधिक श्रीमंत होण्याचा छंद जडला आहे तो स्वतःला ‘फकीर’ म्हणवून घेतो व विरोधकांना भ्रष्टाचारी म्हणतो. हे सरळ सरळ ढोंग आहे.
धर्मराज युधिष्ठिरची गोष्ट
संजय राऊत म्हणाले की, धर्मराज म्हणजे युधिष्ठिर तहानेने व्याकूळ झाला होता. चारही पांडव भाऊ जंगलात पाण्याचा शोध घेण्यासाठी गेले, ते अद्यापि परत का आले नाहीत या चिंतेने धर्मराज ग्रासला होता. भाऊ परतले नाहीत तेव्हा धर्मराज स्वतःच त्या अरण्यात भावांचा शोध घेण्यासाठी निघाला व एका तळ्याजवळ जाऊन पोहोचला. पाहतो तर काय? त्याचे चारही ‘पांडव’ भाऊ तेथे जणू गतप्राण होऊनच पडले होते, पण घशाला कोरड पडली होती, जीव कासावीस झाला होता म्हणून ओंजळभर पाण्यासाठी त्याने तलावात हात घालताच सारस पक्ष्याच्या स्वरूपातील एका यक्षाने त्याला थांबवले. “थांब! तुझ्या भावांनीही माझे ऐकले नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरे न देता पाणी प्राशन केलंस तर पाण्याचे विष होईल.”, असे यक्ष म्हणाला. त्यावर धर्मराज म्हणाला, “विचार प्रश्न!” यक्षाने प्रश्न केला, “धर्मराज सांग, अदानींच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले?” पहिल्याच प्रश्नाने धर्मराज गोंधळला. यक्षाकडे त्याने हतबलतेने पाहिले. कोपरापासून नमस्कार केला. “येतो मी” सांगून मागे फिरला व तहानेने व्याकूळ होऊन आपल्या भावांच्या जवळ कोसळला! आता मोदी, अदानी यांनीच उत्तर देऊन यक्षप्रश्न सोडवावा व पाच भावांचे प्राण वाचवावे!
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.