आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
हा कटाचा भाग
संजय राऊतांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे. ऊठ मराठ्या ऊठ! ट्विट करून राऊतांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
हा षंढपणा आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता. तीन महिन्यांत महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढ पणा आहे.
संसदेत चर्चा करावी
दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन लवकरच सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सीमावादाच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेच्या सभापतींना स्थगन प्रस्तावाचे पत्र दिले आहे. संसदेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, महाराष्ट्राच्या वाहनांवर झालेले हल्ले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे चिथावणीखोर वक्तव्य यावर चर्चा करावी, अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली आहे.
केंद्राचा पाठिंबा आहेच
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, दिल्लीतील केंद्र सरकारच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर असे हल्ले होऊ शकत नाहीत. यामुळे वातावरण आणखी चिघळण्याची भीती आहे. एकीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणतात, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हल्लेखोरांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री शिंदेंना बोम्मई सांगतात की, सर्वोच्च न्यायालयात हा वाद सुरू असेपर्यंत दोन्ही बाजूंनी शांत रहावे. यानंतर बोम्मईच चिथावणीखोर वक्तव्य करतात. म्हणजेच बोम्मईंनी दिल्लीतूनच पाठिंबा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे केंद्रानेच आता तातडीने येथे शांतता प्रस्थापित करावी, अशा मागणीसाठी या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी आम्ही केली आहे.
बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करा
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, देशात एकीकडे इशान्येकडील राज्यात सीमावाद सुरू आहे. आणि अचानक महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद का उकरून काढण्यात आला? केंद्र सरकारने तातडीने बेळगावमधील सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावा. अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल आणि त्याला जबाबदार केंद्रीय गृहमंत्री असतील, असा इशारा राऊतांनी दिला.
शिंदेंनी आता भाईगिरी दाखवावी
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात मी बेळगावमध्ये जाऊन कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आहेत. मग आता त्यांच्या तोंड्याला कुलूप का आहे. त्यांना महाराष्ट्रात भाई म्हणतात. मग आता भाईगिरी दाखवा ना. मुख्यमंत्री सीमावाद प्रश्नी म्हणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. शहांची भेट घेऊन शिंदे करणार काय? वाद महाराष्ट्र-कर्नाटकात सुरू आहे. त्यांनी तेथेच भाईगिरी करावी.
बोम्मईंवर निशाणा
संजय राऊत म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आहेत कोण? ते मुळचे काँग्रेसचे आहेत. नंतर भाजपमध्ये आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही ओरिजनल शिवसेनेचे नाहीत. अशा डुप्लीकेट लोकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने बेळगावला जाऊन नागरिकांच्या भेटी घ्याव्यात. मात्र, ते डरपोक आहेत. लवकरच यावर त्यांनी तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात डरपोक मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना गणले जाईल.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारवर दावा ठोकला पाहीजे. जे हल्ले झाले, त्यात महाराष्ट्रातील गाड्यांचे नुकसान झाले आहे. केंद्राच्या संमतीशिवाय हे होऊच शकत नाही. सीमाभागातील जनतेशी महाराष्ट्राचे असलेले संबंध सरकारला तोडायचे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.