आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांच्या वक्तव्याची शहानिशा व्हावी:विरोधी पक्षनेते अजित पवारांचे आवाहन; सभागृहात दाऊद आहे का, शेलारांचा खोचक सवाल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी हक्कभंग आणण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. यावेळी अजित पवार-आशिष शेलार आणि अतुल भातखळकरांमध्ये शाब्दिक चकमक रंगल्याचे पाहायला मिळाले.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या विधानाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. आशिष शेलार म्हणाले, संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान होत आहे. हा महाराष्ट्र द्रोह आहे. महाराष्ट्राबाबत ही भावना असेल तर भूमिका स्पष्ट केली पाहिजे. या सभागृहात बसलेल्यांना चोर म्हणत आहात तर या सभागृहात दाऊद आहे का? असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बोटचेपी भूमिका मान्य नाही.

शहानिशा करा

शेलार यांच्या मागणीवर अजित पवार म्हणाले, कुठल्याही व्यक्तीला चोर म्हणण्याचा अधिकार नाही. प्रत्येकाने शिस्त, नियम पाळायला हवे. ते खरोखर बोलले आहेत का त्या विधानाची चौकशी करावी, शहानिशा करावी. मी त्यांची बाजू घेत नाही. मात्र कुठल्याही एका बातमीद्वारे अशी कारवाई करु नये.

हक्कभंग समितीकडे पाठवा

भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले, संजय राऊत यांनी विधिमंडळाचा अपमान केला. त्यांनी विधिमंडळ नव्हे चोरमंडळ म्हटलेले सरळ दिसत आहे. या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे. यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपासूनची उज्जवल परंपरा आहे. तरीही तुम्ही चोरमंडळ म्हणता. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आपण आजच्या आज हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवा. त्यावर तातडीने सुनावणी केली पाहिजे. आणि असे बोलणाऱ्यांना शिक्षा करा, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

संबंधित वृत्त

विधिमंडळ नाही हे चोरमंडळ

विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे. ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचे विधानभवनातही तीव्र पडसाद उमटले. वाचा सविस्तर