आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात देशभरात आगडोंब उसळलेला असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी या योजनेवर आज सडकून टीका केली. अग्निपथ योजनेमुळे देशभरात भारतीय सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. ठेकेदारी, कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करणे हे धोकादायक असल्याचे संजय राऊत यांनी सुनावले.
केंद्राची प्रत्येक योजना अपयशी
नोटाबंदी असो की शेतकऱ्यांसाठी आणलेला कृषि कायदा, केंद्र सरकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. 2 कोटी युवकांना नोकरी देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारने नंतर 10, 12 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले. मात्र, एकही आश्वासन मोदी सरकार पूर्ण करु शकले नाही. उलट देशात महागाई, बेरोजगारी वाढली. त्यामुळे तरुणांमध्ये आक्रोश असल्याचे संजय राऊत म्हणाले.
लष्करात ठेकेदारी कशी?
कंत्राटी पद्धतीने किंवा ठेकेदारीने गुलामांना कामावर ठेवले जाते. प्रसार माध्यमांसारख्या क्षेत्रात एकवेळ या पद्धतीचे समर्थन करता येईल. मात्र, लष्कराला एक शिस्त असते. सैनिक हे निष्ठावान असतात. कंत्राटी पद्धतीने त्यांची भरती कशी काय केली जाऊ शकते?, असा सवाल संजय राऊत यांनी केला. अशा पद्धतीने सैनिकांची भरती झाल्यास देशातील सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
सैन्य पोटावर चालत
सैन्य हे पोटावर चालत असतं. त्यांना फक्त चार वर्षे नोकरी देणं. हा संपूर्ण सैन्य दलाचा अपमान आहे. त्यामुळे सुरक्षेविषयीही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. वेळीच अग्निपथ योजनेत सुधारणा न केल्यास संपूर्ण देशालाच आग लागू शकते, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
भाजप मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात
राष्ट्रपती निवडणुकीच्या उमेदवाराबाबत विरोधी पक्ष आणि भाजपमध्ये सहमती व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याबाबत विरोधी पक्षांचे नेते आणि भाजपही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. दोन्ही बाजूंच्या सहमतीने राष्ट्रपती पदासाठी उमेदवार निश्चित केला जाईल, अशी माहिती यावेळी संजय राऊत यांनी दिली.
किरीट सोमय्यांचा घोटाळा
INS विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल आहे. चौकशीदरम्यान INS विक्रांतसाठी जमा केलेला निधी पक्षाकडे सुपूर्द केल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितल्याचे समोर येत आहे. त्यावर हादेखील घोटाळाच असल्याचे संजय राऊत म्हणाले. सोमय्यांनी हा निधी राजभवनाकडे जमा करणार असल्याचे सांगत लोकांकडून कोट्यवधींचा निधी गोळा केला आणि तो राजभवनाकडे न देता पक्षाकडे जमा केला, हा गंभीर प्रकार असून पोलिस अधिक तपास करत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.