आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर:कुणाच्या अल्टिमेटवरवर राज्य चालत नाही, हिंदु ओवेसींना सुपारी देऊन वातावरण बिघडवण्याचा भाजपचा प्रयत्न

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरातील मशिदींवरील भोंगे 4 मेपर्यंत उतरवण्याचा अल्टिमेट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यासंदर्भात आज शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असून आजच पुढील भूमिकाही राज ठाकरे जाहीर करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे व भाजपवर जोरदार टीका केली.

कुणाच्या अल्टिमेटमवर राज्य चालत नाही. कुणाच्या धमक्यांनी महाराष्ट्रातील स्थिती बिघडणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, हिंदु ओवेसींना सुपारी देऊन महाराष्ट्रात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी सुपारी देणाऱ्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सत्ता न मिळाल्यामुळे काही आत्मे अस्वस्थ!
राज्यात पुन्हा सत्ता न मिळाल्यामुळे काही आत्मे अस्वस्थ झाले आहेत. ते आपले वैफल्य अशा इतर मार्गांनी बाहेर काढत आहेत. त्यासाठी ते इतरांचा वापर करत आहेत, असा आरोप राऊत यांनी भाजप व राज ठाकरेंवर केला. तसेच, राज्यातील शांतता बिघडवण्यासाठी कोणाकडून सुपारी दिली जात असेल तर अशा सुपारीबाज लोकांचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.

महाराष्ट्रातील प्रशासन भक्कम, अशा धमक्यांनी फरक पडणार नाही!
आजकाल कुणीही येतो आणि महाराष्ट्राला धमकी देतो. मात्र, महाराष्ट्र हा मजबूत पायांवर उभा आहे. महाराष्ट्रातील प्रशासन भक्कम आहे. गृहमंत्री संयमी असण्यासोबतच सक्षम आणि मजबूत आहे. त्यामुळे आपल्या धमक्यांमुळे राज्यातील वातावरण बिघडेल, असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. महाराष्ट्रात असे कधीही होऊ शकत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

राज्यात फुले विरुद्ध टिळक वाद निरर्थक
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लोकमान्य टिळकांनी उभारले, असे वक्तव्य औरंगाबादेतील सभेत राज ठाकरे ठाकरे यांनी केले होते. त्यावर आता अनेक ठिकाणी पडसाद उमटत आहेत. त्यावर राऊत म्हणाले, काही जणांकडून राज्यात टिळक विरुद्ध फुले, असा वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हा वाद किती निरर्थक आहे. हे गेल्या 2 दिवसांत दिसून आले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर पुढे काहीही होणार नाही, असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...