आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातली लोकशाही संपली आहे. तिचा मुडदा पडला आहे, असा आरोप सोमवारी खासदार संजय राऊत यांनी केला. सरकारच्या विरोधात बोलले की, विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी, सीबीआयचे हल्ले होत आहेत. जनता भाजपच्या नावाने शिमगा करत असून, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही संतप्त असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमधल्या केम्ब्रिज विद्यापीठात भारतातली लोकशाही धोक्यात आल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे या वक्तव्याची जगभरात चर्चा झाली. संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.
विरोधकांनी एकत्र यावे
संजय राऊत म्हणाले की, देशातली लोकशाही संपली असून तिचा मुडदा पडला आहे. त्यामुळे विरोधकांनी एकत्र यायला हवे. काँग्रेस, आम आदमी पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, अखिलेश यादव या सर्वांनी एकत्र येऊन लढावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवल्याचे ते म्हणाले.
हुकूमशाहीपेक्षा भयंकर
संजय राऊत पुढे म्हणाले की, सध्या देशात हुकूमशाहीपेक्षा भयंकर वातावरण आहे. सरकारविरुद्ध बोलणे गुन्हा ठरवला जातो आहे. त्यांच्यावर ईडी, सीबीआय, तपास यंत्रणांकडून कारवाई होत आहे. तालिबान, अल कायदा सारखे लोक विरोधकांना नष्ट करण्यासाठी हातात शस्त्र उचलतात. मात्र, या सरकारने तपास यंत्रणांचे शस्त्र हाती उचलले आहे. त्यामुळे लोकशाही संपली असून, तिचा मुडदा पडल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेना आमचीच
उद्धव ठाकरे यांच्या कोकणातल्या खेडमधल्या सभेत गर्दी नव्हती, तर शिवसेनेचा महासागर उसळला होता. लाखोंच्या संख्येने लोक आले होते. शिवसेना निवडणूक आयोगाच्या बापाची जहागीर नाही, कागदावर निर्णय काहीही होऊ द्या, शिवसेना आमचीच आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.