आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्यवीर सावरकरांवरून सध्या भाजप व शिवसेना आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीकेचे आसूड ओढले. मात्र, ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळण्याची शक्यता आहे.
व्हायरल व्हिडिओचा आधार घेत खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे यांचे देवेंद्र फडणवीसांना 'वाचू का?', असे विचारणे हीच तर गुलामी आहे, अशी टीका त्यांनी केली.
नेमके झाले काय?
काल देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्रित पत्रकार परिषदेला आले तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या हातात एक कागद होता. पत्रकार परिषद सुरू होईपर्यंत एकनाथ शिंदे तो कागद वाचत होते. पत्रकार परिषदेला सुरुवात करायची तोच एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांच्या कानात हळूच विचारले की, वाचू का?. त्यावर 'नाही, वाचण्याची काही गरज नाही', असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे तोपर्यंत वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे सुरू झाले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमधील ही कुजबूज कॅमेऱ्यातही कैद झाली.
फडणवीसांना आणखी काही सांगायचे होते
'वाचण्याची काही गरज नाही', असे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना सांगितले. मात्र, त्यानंतरही फडणवीसांना काही तरी सांगायचे होते. फडणवीसांनी तोंडावर हात ठेवत एकनाथ शिंदे यांना ते सांगण्याचा प्रयत्नही केला. मात्र, समोर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असल्यामुळे त्यांनी आपला मोह आवरता घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. मात्र, सुरुवातीला एकनाथ शिंदे यांना लय सापडत नव्हती. संथपणे त्यांनी टीकेला सुरुवात केली व नंतर बऱ्याचदा आपल्याकडे असलेल्या कागदाकडे पाहतच त्यांनी आपले म्हणणे मांडले.
सुरुवातीला फडणवीसही अस्वस्थ
एकनाथ शिंदे यांनी आपले म्हणणे सुरू केले, तेव्हा सुरुवातीला काही वेळ देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरही अस्वस्थता दिसत होती. परंतु, एकनाथ शिंदे यांचे सुरुवातीचे काही वाक्ये झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसही काहीसे रिलॅक्स होताना दिसले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे हे भाजपने लिहून दिलेले स्क्रिप्ट वाचतात, असा आरोप नेहमीच केला जातो. त्यामुळे या व्हिडिओमुळे विरोधकांच्या हातातही आयते कोलीत मिळाले आहे.
हीच तर गुलामी- संजय राऊत
दरम्यान, या व्हिडिओवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना जोरदार चिमटा काढला आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंना अजूनही देवेंद्र फडणवीसांची परवानगी घ्यावी लागते. हीच तर गुलामी आहे. आणि याच गुलामीविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर लढले होते.
दोन वाक्य उत्सफूर्तपणे बोलू शकत नाही
पुढे संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत दोन वाक्य उत्फूर्तपणे बोलू शकत नाही. एक कागद समोर होता तोच एकनाथ शिंदे वाचून दाखवत होते. एकनाथ शिंदे यांना सावरकरांविषयी काही माहिती तरी आहे का? सावरकरांच्या दोन क्रांतीकारक बंधूंचे नाव तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकतात का? संपूर्ण शिंदे गट गद्दार आहे. तो काय सावरकर गौरव यात्रा काढणार.
संबंधित वृत्त
हिंदूत्वावरुन पलटवार:'सावरकर गौरव यात्रा' नव्हे, ही तर 'अदानी बचाव यात्रा'; संजय राऊतांचे भाजप, शिंदे गटावर टीकास्त्र
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग व देशभक्तीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी राज्याच्या गावागावात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावर ती 'सावरकर गौरव यात्रा' नव्हे तर ती 'अदानी बचाव यात्रा', 'खुर्ची बचाव यात्रा' आहे, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.