आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरू आहेत. कश्मीरात पंडितांच्या हत्या सुरूच आहेत आणि आता पंजाबात पुन्हा खलिस्तानी खदखद उफाळून येत आहे. अंधभक्तांचे विश्वगुरू त्यावर काहीच बोलत नाहीत, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.
सामनामधील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, आमच्यासारखे देशभक्त दुसरे कोणीच नाहीत, असे ढोल रोज पिटणाऱ्यांच्या राज्यात आपण जगत आहोत. पण देशात काय सुरू आहे? कश्मिरी पंडिताची दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. कश्मिरी पंडितांचे आक्रोश व संतापाचे चित्र जम्मूपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र दिसत आहे. पण भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या अटकेचे नाटय़ दोन दिवस रंगवून कश्मिरी पंडितांच्या आक्रोशावर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला.
कश्मिरी पंडितांना अधिकार मिळाले काय?
संजय राऊत म्हणाले, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी पुलवामा जिल्हय़ात पत्नीसह बाजारात गेलेल्या संजय शर्मा या पंडिताची हत्या झाली. आपल्या पतीला दहशतवाद्यांनी गोळय़ा घालताना पत्नीने पाहिले. त्यानंतर आकांत करतानाचे तिचे छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध झाले. 370 कलम हटवले गेले ते फक्त कागदोपत्री व भाजपच्या राजकीय सोयीसाठी. कश्मीर हा हिंदुस्थानचा भाग होता व आहेच. 370 कलमाने कश्मीरला विशेष अधिकार मिळाले होते. ते काढून घेतले, पण 370 कलम हटवल्यावर कश्मिरी पंडितांना त्यांचे अधिकार मिळाले काय? याचे उत्तर भाजपचा एकही बडा नेता देऊ शकलेला नाही.
पंडितांच्या हत्येचे राजकारण
संजय राऊत म्हणाले, 370 कलम हटवूनही मोदी-शहा पंडितांचे रक्षण करू शकले नाहीत. मेहबुबा मुफ्ती त्यावर म्हणाल्या, ‘‘कश्मिरी पंडितांच्या हत्या व्हाव्यात व ते असुरक्षित असावेत हीच भाजपची इच्छा आहे, कारण पंडितांच्या बलिदानावरच त्यांचे राजकारण सुरू आहे.’’ मेहबुबा मुफ्ती यांच्याशी मतभेद असणाऱ्यांनाही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. पुलवामात बळी पडलेल्या संजय शर्मांच्या पत्नीचा आक्रोश तोच प्रश्न विचारीत असावा.
काश्मिरात हिंदू मोर्चा का नाही?
संजय राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्ष अहंकार व उर्मटपणाच्या कळसावर पोहोचला आहे व त्या टोकावरून आता त्यांना देशाचे खरे प्रश्न दिसत नाहीत. अदानी यांचा भ्रष्टाचार पाठीशी घालून त्यांना वाचविणारे सरकार कश्मिरी पंडितांना वाचवत नाही हे नोंद करण्यासारखे आहे. महाराष्ट्रासह सर्वत्र भाजपपुरस्कृत सकल हिंदू आक्रोश मोर्चे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात काढले जात आहेत. असे सकल हिंदूंचे आक्रोश मोर्चे कश्मिरी पंडितांच्या हत्येविरोधात का निघू नयेत? या सकल मोर्चावाल्यांनी जम्मू-कश्मीरातील हिंदूंचे हाल काय ते समजून घेतले नाहीत. पुलवामाच्या बाजारात संजय शर्मांची हत्या त्यांच्या पत्नीसमोर झाली. तेथे हिंदू मोर्चा निघाला असता तर बरे झाले असते, पण तेथे शेपटय़ा घालायच्या व महाराष्ट्रात ‘हिंदू खतरे में’ म्हणून छाती पिटायची. हे राजकारण समाज बिघडवत आहे.
खलिस्तानवाद्यांच्या बाबतीत धाडस दाखवणार नाही
संजय राऊत म्हणाले, पंजाबात पुन्हा एकदा खलिस्तानचा झेंडा फडकावा हे धक्कादायक आहे. एका आरोपीस सोडविण्यासाठी ‘खलिस्तान’चे नारे देत मोठा जमाव पोलीस स्टेशनवर चाल करून जातो ही केंद्रीय सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. खलिस्तानचे गाडलेले भूत तेथे पुन्हा जिवंत होताना दिसत आहे. अमृतपाल सिंह हा खलिस्तानी चळवळीचे नेतृत्व करतोय व हिंसा घडवून आणतोय. त्याच्या चळवळीस पैसा कोठून येतोय याचा तपास करण्याची हिंमत मोदी-शहांच्या प्रिय ‘ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्स’ने दाखवायला हवी. अशी हिंमत ते अदानींच्या बाबतीत दाखवू शकले नाहीत व पंजाबातील खलिस्तानवाद्यांच्या बाबतीतही दाखवणार नाहीत.
निरो देशभक्तीची बासरी वाजवत आहे
संजय राऊत म्हणाले, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना सीबीआयने अटक केली. तसा फास पंजाबात खलिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांच्या बाबतीत का आवळला नाही? सरळ सरळ परदेशी पैसा या चळवळीत पुन्हा येऊ लागला व मोदी-शहा त्यावर गप्प आहेत. पंजाबातील ‘मोगा’ येथील सरकारी कार्यालयाच्या भिंतीवर खलिस्तान समर्थनार्थ घोषणा रंगवण्यात आल्या. हा विषय देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा आहे. त्यामुळे राज्य सरकारवर हे सर्व ढकलून चालणार नाही. तुम्ही देशाचे राज्यकर्ते आहात व सध्या ‘बादशाही’ पद्धतीने राज्य करत आहात. कश्मीर व पंजाबातील घटनांपासून तुम्हाला पळ काढता येणार नाही. दोन्ही सीमावर्ती राज्ये आता स्फोटक स्थितीतून जात आहेत. कधीही आग लागेल अशी स्थिती असताना दिल्लीचे ‘निरो’ फक्त देशभक्तीची बासरी वाजवीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.