आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राऊतांचा निशाणा:83 वर्षांचे रतन टाटा मुंबईहून पुण्यास गेले, पण दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्य़ांना भेटायला जात नाहीत, राऊतांचे मोदींवर टीकास्त्र

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकशाही या संस्थेवरील लोकांची श्रद्धा आता पूर्ण उडाली आहे!

स्वातंत्र्याचे हवन परकीयांकडूनच होते असे नाही. स्वातंत्र्यासाठी घामही न गाळणारे राज्यकर्ते म्हणून येतात तेव्हा ते स्वातंत्र्यावरच सगळ्यात निर्घृण हल्ला करतात. आजारी कर्मचाऱ्य़ाला भेटण्यासाठी 83 वर्षांचे रतन टाटा मुंबईहून पुण्यास पोहोचले, पण दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्य़ांना भेटायला जात नाहीत. बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्य़ांनी देश खराब केला, दुसरे काय? असे म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सामनातील रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी राऊतांनी टीकास्त्र साधले आहे.

सामना अग्रलेखात नेमके काय?

  • सध्या आपल्या देशात नक्की काय सुरू आहे ते ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना संसर्गाच्या दहशतीमुळे वर्षभर परदेशात गेले नाहीत. ते हिंदुस्थानातच आहेत, पण हिंदुस्थानातील जनतेचे किती प्रश्न या काळात सुटले? ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे कोरोनाचा नवा स्टेन्स घेऊन 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ात अवतरणार होते, पण इंग्रज हे जात्याच शहाणे असल्याने जॉन्सन साहेबांनी आता दिल्लीस येण्यास नकार दिला.
  • वर्षभरापूर्वी प्रे. ट्रम्प हे अहमदाबादेत ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी अवतरले तेव्हा 50 लाख लोकांनी स्वागत केले. ट्रम्प व त्यांच्याभोवती असलेल्या अमेरिकन मंडळींनी कोरोनाचा प्रसार केला व निघून गेले. ते प्रे. ट्रम्प आता सत्ता गमावून बसले आहेत. प्रे. ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरले, पण निवडणुकीच्या विरुद्ध गेलेला निकाल फिरवावा व आपल्यालाच विजयी घोषित करावे यासाठी प्रे. ट्रम्प निवडणूक निर्णय अधिकाऱ्य़ांकडे कसे गयावया करीत होते याबाबतचा गौप्यस्फोट आता झाला आहे.
  • अमेरिका असेल किंवा हिंदुस्थान, आता लोकशाही ही शोभेचा आणि पोकळ डोलारा म्हणूनच उभी आहे. निवडणूक निकाल फिरवावा म्हणून ट्रम्प यांनी गयावया केली. हिंदुस्थानी लोकशाही पद्धतीत अशी गयावया वगैरे करावी लागत नाही. विरोधात उभे राहणाऱ्य़ांना नष्ट केले की काम भागते आणि निवडणुकांचे निकाल ठरवून घेतले की झाले! लोकशाही या संस्थेवरील लोकांची श्रद्धा आता पूर्ण उडाली आहे!
  • टाटा का मोठे? दिल्लीची रया पूर्ण जाताना दिसत आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्य़ांचे सगळय़ात मोठे आंदोलन सुरू असतानाही दिल्लीच्या सत्तावर्तुळात साधी सळसळ जाणवत नाही.
  • आज देशात नक्की कोणती ‘शाही’ आहे ते कोणीच सांगू शकणार नाही. आपण मागासलेले जरा जास्तच झालेलो आहोत. देशभक्तीची नवी लस सध्याच्या राज्यकर्त्यांनी लोकांना टोचली आहे. त्या लसीचा परिणाम असा की, सध्या आपल्या देशात प्रचाराचा, विकासाचा, विचाराचा मुद्दा म्हणजे देशभक्ती हाच बनला आहे. जणू काही ‘देशभक्ती’ या शब्दाचा उदय 2014 नंतर झाला. त्याआधी शतकानुशतके देशभक्ती कशाशी खातात हे हिंदुस्थानवासीयांना माहीत नव्हते.
  • स्वातंत्र्य संग्रामात जे सहभागी झाले व मरण पावले तेसुद्धा सध्याच्या युगात देशभक्त नसावेत. पंतप्रधान मोदी व भाजपचा जयजयकार करीत आहेत तेच देशभक्त असे आता नक्की करण्यात आले आहे. हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन यांच्यावर टीका करणारे व त्यांच्या विरोधात बोलणारेही एकतर देशभक्त नव्हते अथवा ते क्रांतीचे म्हणजे देशाचे शत्रू ठरवले गेले.
  • पंजाबच्या सीमेवर शेतकरी थंडी-वाऱ्य़ात कुडकुडत उभा आहे. या आंदोलनात 57 शेतकरी मरण पावले. त्यांच्याविषयी संवेदनेचा एकही चकार शब्द न काढणाऱ्य़ांचे सरकार दिल्लीत आहे. असे माणुसकी नसलेले सरकार कोणत्या ‘शाही’त बसते? टाटांसारखे लोक मोठे का? हे अशा वेळी समजते. आपला एक माजी कर्मचारी आजारी आहे हे समजताच रतन टाटा हे मुंबईतून प्रवास करीत पुण्यात गेले. त्या कर्मचाऱ्य़ाला त्याच्या छोटय़ा घरात जाऊन भेटले. त्याच्या कुटुंबास धीर दिला. प्रत्येक पिढीतले ‘टाटा’ हे भारतरत्न का झाले व अंबानी-अदानी यांना ‘टाटां’ची प्रतिष्ठा का मिळू शकली नाही त्याचे उत्तर टाटांच्या या जीवनशैलीत आहे. हे टाटादेखील सध्या मोदी नीतीचे समर्थक आहेत.
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser