आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कायद्याच्या चौकटीत राहून लवकरात लवकर निर्णय द्यावा लागेल. अन्यथा भविष्यात त्यांना रस्त्यावर फिरणे अवघड होईल, असा इशारा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
पक्षांतर हा राहुल नार्वेकरांचा छंद
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, राहुल नार्वेकर हे लंडनमधून सध्या मुलाखती देत आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचीही चौकशी करण्याची भाषा ते करत आहेत. राहुल नार्वेकर यांचा पक्षांतराचा इतिहास मोठा आहे. पक्षांतर हा राहुल नार्वेकर यांचा छंद आहे. पक्षांतराला उत्तेजन देणे हा त्यांचा व्यवसाय आहे. आम्ही त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत नाही. त्यांनी फक्त सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. अन्यथा महाराष्ट्र काय आहे, हे आम्हाला दाखवावे लागेल.
संजय राऊत म्हणाले, राहुल नार्वेकर हे वकिल असतील तर त्यांनी न्यायालयाचा निकाल पुन्हा वाचावा. त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय द्यावा लागेल. तोदेखील लवकर द्यावा लागेल. पक्षांतराला उत्तेजन देऊन लोकशाहीची हत्या होत असेल तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही.
कोश्यारींनी निवडणूक होऊ दिली नाही
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन बदमाश राज्यपालांनी आम्हाला अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ दिली नाही. दिल्लीच्या आदेशावर राज्यपालांनी असे केले. कारण त्यांना पुढे सरकार पाडायचे होते. त्यामुळेच ज्याला लोकशाहीबद्दल चाड नाही. पक्षांतराबद्दल राग नाही, अशा व्यक्तीला राज्यपाल पदावर बसवण्यात आले. भगतसिंह कोश्यारींना महाराष्ट्र आज काय म्हणून ओळखतो, हे राहुल नार्वेकरांना माहित असावे. इतिहासात तुमचीही नोंद काळ्याकुट्ट अक्षरांनी होऊ नये, याची खबरदारी नार्वेकरांनी घ्यावी.
आज मविआची बैठक
संजय राऊत म्हणाले, आज संध्याकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. आघाडीतील सर्वपक्षीय प्रमुख नेते या बैठकीला येणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरेही बैठकीला येणार आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्याबाबत तसेच जागा वाटपाचे सुत्र ठरवण्याबाबत बैठकीत प्राथमिक चर्चा होईल.
2024ची तयारी सुरू
संजय राऊत म्हणाले, आम्ही 2024 लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. कर्नाटक तो झाँकी है, पुरा देश अभी बाकी है. भाजपने सगळी आर्मी लावूनही कर्नाटकच्या जनतेने त्यांचा पराभव केला. सामान्य जनतेने हुकुमशाहीचा केलेला हा पराभव आहे. महाराष्ट्र हे भाजपने लुटलेले राज्य आहे. हे लुटलेले राज्य फार काळ टिकणार नाही.
संबंधित वृत्त
निवडणुकांचे वेध:‘ऑपरेशन लोटस’च्या परिणामांवर भाजपचे मंथन; कर्नाटक निकालाने महाराष्ट्र अलर्ट; भाजप, आघाडीत बैठकांचा धडाका
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा मोठा पराभव झाला, तर देशात पिछाडीवर असलेल्या काँग्रेसला येथील जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिला. शेजारी राज्यातील या निकालाने वर्षभरावर लोकसभा-विधानसभा निवडणुका आलेल्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षही खडबडून जागे झाले आहेत. प्रदेश भाजपने पुढील रणनीती ठरवण्यासाठी दोन दिवसांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे, तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते पुढील आठवड्यात आगामी रणनीती ठरवण्यासाठी एकत्र बैठक घेेणार आहेत. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.