आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाश्मीर रक्तबंबाळ झाले आहे आणि भाजप सत्तेची आठ वर्षे कसली साजरी करत आहे? काश्मिरी पंडितांचा आक्रोश केंद्र सरकारच्या कानात जात नाही का? काश्मिरमध्ये 1990 ला जेव्हा हत्याकांड झाले तेव्हा आणि आता देखील भाजप सत्तेत असताना काश्मिरी पंडितांची हत्या सुरू आहे, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्येवरुन केंद्र सरकारवर टीका केली. ते आज मुंबईत पत्रकाराशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये हत्याकांड सुरू असून, काश्मिरी पंडित पलायन करत आहेत. त्यावरुन राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
ते म्हणाले की, काश्मीर पुन्हा एकदा जळत आहे, रक्तबंबाळ होत आहे, काश्मिरची स्थिती नियंत्रणाहून बाहेर गेली आहे आणि आमचे दिल्लीचे प्रमुख लोकं त्यांच्या राजकीय प्रमोशनमध्ये गुंतले आहे, कधी 'काश्मिर फाईल्स' या चित्रपटाचे प्रमोशन करतात तर कधी 'पृथ्वीराज'चे प्रमोशन होत आहे. काश्मिरी पंडितांचे आक्रोश ऐकायला मात्र कोणीही तयार नाही, असे म्हणत राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र केले.
सरकार काय करत आहे
काश्मिरमध्ये पंडितांची, हिंदू समाजातील लोकांची याबरोबरच मुस्लिम समाजातील सुरक्षा रक्षकांची देखील हत्या केली जात आहे. आतापर्यंत 20 मुस्लिम सुरक्षा रक्षकांची हत्या झाली आहे. काश्मिरी पंडितांना देखील त्रास देऊन त्यांना पळवले जात आहे त्यांची हत्या करण्यात येत आहे. हजारो पंडित काश्मीर खोरे सोडून इतर ठिकाणी जात आहे, मात्र सरकार काय करत आहे, असा सवाल राऊतांनी केंद्र सरकारला केला आहे.
काश्मिरमध्ये लोकांचे आक्रोश
काश्मीर हिंदुंच्या रक्तांनी भिजून चालला आहे. रोज काश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हजारो पंडित आपल्या मुलांबाळांसोबत पलायन करत आहेत. काश्मिरमध्ये लोकांचे आक्रोश चालले आहे आणि इकडे सरकार पृथ्वीराज चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. एकही भाजपचा नेता तोंड उघडायला तयार नाही. ताजमहाल खालचे शिवलिंग शोधण्यात येत आहे, ज्ञानवापीत देखील तुम्ही तेच करतायेत, भाजप वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काश्मिरी पंडितांचे आक्रोश ऐकायला भाजपकडे वेळ नाही, असे म्हणत राऊतांनी भाजपवर टीका केली.
चिंता व्यक्त केली
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांच्या पलायन आणि हत्येवर चिंता व्यक्त केली, महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीने काश्मिरी पंडितांच्या पाठीमागे आहे, त्यांच्यासाठी व त्यांच्या कुंटुंबियांना हवी ती मदत राज्य सरकार करणार आहे, त्यासंबधी आम्ही एक योजना देखील आखत असल्याचे राऊत म्हणाले.
राऊत अयोध्या दौऱ्यावर
प्रमुख 15 ते 20 जण आम्ही अयोध्येला जात आहोत. उद्या देखील आम्ही अयोध्येतच असणार आहोत. त्याठिकाणी लोकांच्या भेटीगाठी घेणार असून, 15 जूनला आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी आम्ही अयोध्येत जात आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख जण आज अयोध्येला जात आहेत.
शक्ती प्रदर्शन नाही
15 जूनला आदित्य ठाकरे हे अयोध्येत येतील. हे काही आमचे राजकीय शक्ती प्रदर्शन नाही, पण महाराष्ट्रातील काही प्रमुख लोकं त्या दौऱ्यामध्ये उपस्थित असतील. हा एक धार्मिक आणि श्रद्धेचा विषय आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये कोरोना असल्याने आम्हाला अयोध्येला जाणे जमले नाही. 10 जूनला अयोध्येसाठी आमची तारीख ठरली होती, मात्र 10 जूनला राज्यसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे आमदारांना उपस्थित राहावे लागेल त्यामुळे 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येत येतील, असे संजय राऊत म्हणाले.
योगींकडून खूप अपेक्षा
योगींना आमच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. योगी हे प्रमुख नेते आहेत. हिंदुत्वावादी विचारांचे एक प्रखर असे राष्ट्रीय नेते आहेत. योगींकडून देशाला खूप अपेक्षा आहे, असे म्हणत राऊतांनी योगींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.